- राज्य
- '... म्हणून सूरज चव्हाण यांना दिली जबाबदारी'
'... म्हणून सूरज चव्हाण यांना दिली जबाबदारी'
कोणतेही मतभेद नसल्याचा प्रफुल्ल पटेल यांचा दावा
भंडारा: प्रतिनिधी
छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणावरून पदावरून हटविण्यात आलेले सूरज चव्हाण यांना पुन्हा नवे पद देण्याबाबत कोणतेही मतभेद नाहीत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या संमतीने हा निर्णय घेतला आहे, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिले.
विधिमंडळात रमी खेळणारे मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध करणाऱ्या छावा संघटना कार्यकर्त्यांना मारहाण केल्या. प्रकरणी उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख अजित पवार यांनी चव्हाण यांना त्वरित राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांना प्रदेश सरचिटणीस पदावर बढती देण्याचा निर्णय पक्षाच्या कोअर कमिटीने घेतला. त्याबद्दल आपल्याला काही माहीत नसल्याचे अजित पवार यांनी सांगिले.
त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांचे पक्षावर नियंत्रण राहिले नसल्याचा आरोप केला. त्यांच्या पक्षात दोन गट असून भाजप बद्दल प्रेम असलेला गट अजित पवार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतो. चव्हाण यांना बढती देण्याचा निर्णय हा त्याचात एक भाग असल्याचे पवार म्हणाले. त्यावरून अजित पवार यांनी देखील रोहित पवार यांची खरडपट्टी काढली आहे
याबाबत बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, यापूर्वी पक्षाच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहणारे चव्हाण हे पक्षाचे जुने कार्यकर्ते आणि आमचे सहकारी आहेत. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव राजीनामा घेऊन करून देण्यात आली आहे. मात्र, या चुकीसाठी त्यांना कायमस्वरूपी दूर ठेवणे योग्य होणार नाही. त्यामुळे सर्व नेत्यांनी एकत्रितपणे त्यांची निवड प्रदेश सरचिटणीस पदी केली आहे,
आम्हाला इतके छोटे नका करू
चंद्रपूर दौऱ्यात रोहित पवार यांनी, वेगळा पक्ष काढून अजित पवार यांनी चूक केली आहे, असे विधान केले होते. त्याचप्रमाणे भाजपची साथ सोडून त्यांनी जर शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले तर दोन्ही पक्ष पुन्हा एकदिलने काम करतील, असा निर्वाळाही त्यांनी दिला होता. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता प्रफुल्ल पटेल म्हणाले की, रोहित पवार यांच्या सारख्या नवख्या नेत्यांच्या बालिश विधानांवर प्रतिक्रिया कसली मागता? मी दीर्घकाळ राजकारणात आहे. सुनील तटकरे यांच्यासारखे नेते 40-40 वर्ष काम करत आहेत. रोहित पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्याएवढे छोटे नका करू आम्हाला, असेही पटेल म्हणाले.