- राज्य
- 'खासदार संजय राऊत हा भविष्य सांगणारा पोपट'
'खासदार संजय राऊत हा भविष्य सांगणारा पोपट'
माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची टीका
सांगोला: प्रतिनिधी
संजय राऊत हा भविष्य सांगणारा पोपट आहे. मात्र, आजपर्यंत त्यांनी काढलेली एकही चिठ्ठी, त्यांचे कोणतेच भविष्यकथन खरे ठरलेले नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे कार्य पमुख उद्धव ठाकरे यांनी हा पोपट पिंजऱ्यात बंद करून ठेवावा, अशा शब्दात माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला.
उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र आले तरी त्याचा राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही. पुणे, ठाणे, नाशिक अशा सर्व महत्त्वाच्या महापालिकांमध्ये महायुतीच सत्तेवर येईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
... सुखाने भाजी भाकर खा
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड गायब असल्याबद्दल संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड उठवली होती. त्यावर बोलताना शहाजी बापू यांनी, तुम्ही पटकन उठा आणि धनखड यांना शोधून काढा, असा उपरोधिक सल्ला दिला. हा भाजपचा अंतर्गत विषय आहे. तुम्ही कशाला त्यात लक्ष घालता? त्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या जवळ बसून सुखाने भाजी भाकर खा, असेही ते म्हणाले.
... विधानसभा निवडणुकीत दिसून आले
एकनाथ शिंदे हे ठाण्याचे नेते की राज्याचे हे विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून दिसून आले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ही निवडणूक झालेली असल्यामुळेच महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे, असा दावाही पाटील यांनी केला. सकाळी नऊ वाजता नारळाखाली बसून पत्रकारांशी बोलायचे आणि साडेनऊ वाजता घरात जायचे, असे करणाऱ्यांना राज्यातील शिंदे यांचे स्थान समजू शकणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
...बेडूक फुगून झालेला बैल
संजय राऊत हे आमच्या मतांवर खासदार झाले आहेत. राऊत म्हणजे फुगून बैल झालेला बेडूक आहे, अशी कठोर टीका देखील शहाजी बापू यांनी केली. ते स्वतःला मोठी नेते समजत असले तरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलण्याएवढे ते मोठे नाहीत, असेही त्यांनी सुनावले.