- राज्य
- 'निवडणूक आयोगावर आरोप करणारे लोक पळपुटे'
'निवडणूक आयोगावर आरोप करणारे लोक पळपुटे'
पवारही गांधी यांच्याप्रमाणे स्क्रिप्टनुसार बोलू लागल्याची फडणवीसांना शंका
मुंबई: प्रतिनिधी
निवडणूक जिंकून देणारे दोन लोक निवडणुकीपूर्वी भेटल्याचे घटना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना इतक्या उशिराने लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची भेट झाल्यानंतरच का आठवली? आता पवार देखील राहुल गांधी यांच्याप्रमाणे आधी लिहिलेल्या स्क्रिप्टनुसार बोलू लागले आहेत का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. आपले आरोप सिद्ध करण्याऐवजी रोज खोटे बोलून पळून जाणारे हे पळपुटे लोक आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भेटलेल्या दोघांनी मतांमध्ये फेरफार करू महाविकास आघाडीला 160 जागा मिळवून देऊ, अशी खात्री दिली होती. त्यांची राहुल गांधी यांच्याबरोबर भेट घालून दिल्यानंतर आम्ही दोघांनीही या मार्गाने न जाता जनतेचा कौल घेण्याचा निर्णय घेतला, असा दावा पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस बोलत होते.
यापूर्वी राहुल गांधी यांच्यासह अन्य विरोधक मतदान यंत्र आणि निवडणूक आयोग यांच्यावर खापर फोडत असताना शरद पवार यांनी अनेकदा याबाबतीत असहमती व्यक्त केली होती. मग आत्ताच राहुल गांधी यांची भेट झाल्यानंतर पवार यांना मतांमध्ये फेरफार करणाऱ्यांची आठवण कशी झाली, असा सवाल फडणवीस यांनी केला.
निवडणूक आयोगावर जाहीरपणे अविश्वास व्यक्त करणारे लोक निवडणूक आयोगाने बोलवले तर त्यांच्यासमोर जात नाहीत. आपले म्हणणे शपथपत्रावर देण्याची मागणी केली तर शपथपत्र देत नाहीत. संसदेत शपथ घेतल्याचे सांगतात. संसदेत शपथ घेतली म्हणून न्यायालयात शपथपत्र देणार नाही, असे म्हणून चालते का? मग निवडणूक आयोगाकडे शपथपत्र देण्यास काय हरकत आहे? आपण खोटे बोलत आहोत, हे माहीत असल्यामुळे तसे केल्यास फौजदारी कारवाई होईल, याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे निवडणूक आयोगासमोर न जाता आणि शपथपत्र न देता रोज खोटे बोलायचे आणि पळून जायचे, असे करणारे हे पळपुटे लोक आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.