- राज्य
- 'रक्ताचे नाते' ट्रस्टचे पुणेकरांना रक्तदानाचे आवाहन
'रक्ताचे नाते' ट्रस्टचे पुणेकरांना रक्तदानाचे आवाहन
पुण्यासह अनेक शहरांमध्ये रक्ताचा तुटवडा
पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील अनेक रक्तपेढ्यांमध्ये, रुग्णालयांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असून या पार्श्वभूमीवर 'रक्ताचे नाते' चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक राम बांगड यांनी पुणेकरांना मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
सध्या पुण्यात दररोज सुमारे १५०० रक्तपिशव्यांची गरज आहे, पण उपलब्धता फक्त ३०० ते ४०० पिशव्यांपर्यंत मर्यादित आहे. महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्यामुळे आणि अनेक रोगांची साथ असल्याने रक्तदान शिबिरांची संख्या घटली आहे. परिणामी, रुग्णालयांमध्ये रुग्णांना वेळेवर रक्त मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
राम बांगड म्हणाले, " रोज रक्तासाठी ४० ते ५० फोन कॉल येतात. त्यातून कसेबसे १० ते १५ रक्तदाते व बॅग उपलब्ध होत आहेत. त्यामुळे नियमित रक्तदान करणं अत्यंत आवश्यक झालं आहे. त्यामुळे पुणेकरांना पुढाकार घेऊन स्वतः रक्तदान करण्यास आणि आपल्या परिसरात शिबिरं आयोजित करण्याचे आवाहन बांगड यांनी केले आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी नजिकच्या हॉस्पिटल मध्ये रक्तदान करावे. सरकारी हॉस्पिटलसची रक्ताची उपलब्धता खूप कमी आहे. विशेषतः A+ आणि B+ रक्तगटाच्या पिशव्यांचा तुटवडा जास्त जाणवत आहे.
रक्तदान केवळ काही मिनिटांचं काम असून, त्यामुळे तीन रुग्णांचे जीव वाचू शकतात, हे लक्षात घेऊन तरुणांनी या सामाजिक जबाबदारीत सहभागी व्हावे, असे आवाहन 'रक्ताचे नाते' ट्रस्टने केले आहे.रक्तदानासाठी राम बांगड ९४२२०८५९२४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.जवळपास संपूर्ण महाराष्ट्र, प्रामुख्याने मुंबई, अहिल्यानगर, संभाजी नगर, सातारा, सांगली, बीड येथे जास्त तुटवडा पडला आहे.