
प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अमोल कारंडे यांच्या नेतृत्व
पोलिसांना गुंगारा देत केले आंदोलन
सातारा : दिव्यांग व विधवांना ६ हजार रुपये मानधन देण्यात यावे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, यासह १७ मागण्यांसाठी दि. ८ जुन पासून बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी साताऱ्यात खिंडवाडी येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्यावतीने पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन दुपारी १ वाजता करण्यात आला. यावेळी अमोल कारंडे, अजय पवार, नामदेव इंगळे, आनंदा पोतेकर, सुरेखा सुर्यवंशी, सागर गावडे, प्रशांत बगले, महेश जगताप, शैलेंद्र बोर्डे, प्रमोद गायकवाड, चंद्रकांत नाळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी मध्यस्थी केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, फलटण, कराड येथे दि. १३ रोजी मुंढण आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देण्यात यावी, शेतमालाला हमी भावावर २० टक्के अनुदान देण्यात यावे, दि. ७ एप्रिल २०२५ रोजी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी साताऱ्यात प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्यावतीने पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन खिंडवाडी येथे करण्यात आले. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते स्वखर्चाने खिंडवाडी येथे दाखल झाले होते. सातारा पोलीस दलाचे या आंदोलनाकडे लक्ष होते. प्रत्येक कार्यकर्त्यावर पोलिसांची पाळत होती. दिव्यांग कार्यकर्त्यांना फोन करुन त्यांचे लोकेशन तपासले जात होते. दिव्यांगाच्या संघटनांनी खिंडवाडी येथे आंदोलन करण्याचा निर्धार केला होता. त्याच अनुषंगाने चार पोलीस कर्मचारी साताऱ्यात कार्यालयावर तर चार पोर्लींस कर्मचारी वाढे फाटा येथे आणि काही खिंडवाडी येथे, काही शेंद्रे येथील कणसे ढाब्याच्या समोर उभे होते. त्याच दरम्यान, सातारा तालुका अध्यक्ष आनंदा पोतेकर, अमोल भातुसे, दिलखुश गायकवाड, गणेश किर्दत आदी कार्यकर्ते कणसे ढाब्यासमोर जमले. तेथे पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलन करु नका येथे अशी विनंती केली. तोपर्यंत खिंडवाडीत प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हाध्यक्ष अमोल कारंडे, सागर गावढे यांनी कराडबाजूकडून पुणे बाजूकडे जाणारी लेन आडवली. सर्व वाहतूक पोलिसांनी सर्व्हीस रोडवरुन वळवली. परंतु तोपर्यंत वाहतुक कोंडी झाली. जोरदार घोषणाबाजी देत तब्बल अर्धा तास आंदोलन सुरु होते. प्रशांत बगले यांनी आक्रमकपणे भाषण केले. दरम्यान, या आंदोलनाची माहिती मिळताच तेथे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे हे पोहचले. त्यांनी विनंती केल्यानंतर आंदोलनकर्ते तेथून उठले. तेथून लॉँग मार्चने सातारा शहराकडे कुच केली. शहरात शिवतीर्थ येथे छ. शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर अभिवादन करुन ठिय्या मारला. तेथे आंदोलन तुर्तास स्थगित केले. दरम्यान, यावेळी बोलताना अमोल कारंडे म्हणाले, हे आंदोलन टप्याटप्याने वाढवण्यात येणार असून दि. १३ रोजी फलटण आणि कराड येथे तहसील कार्यालयासमोर मुंढण आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली जात नाही. दिव्यांगांना ६ हजार रुपये पेन्शन दिली जात नाही तोपर्यंत हा लढा लढत राहु, या सरकारला घाईला आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा दिला.
या आंदोलनात अमोल कारंडे, प्रशांत बगले, दिलखुश गायकवाड, अमोल भातुसे, आनंदा पोतेकर, नामदेव इंगळे, गणेश पवार, अजय पवार, शैलेंद्र बोर्डे, सागर गावडे, महेश जगताप, प्रमोद गायकवाड, संग्राम इंगळे, सुरेखा सुर्यवंशी, चंद्रकांत नाळे, यांच्यासह जिह्यातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.
About The Author
Latest News
