- राज्य
- वाल्मीक कराडच्या सीआयडी चौकशीला सुरुवात
वाल्मीक कराडच्या सीआयडी चौकशीला सुरुवात
अटकेनंतर बिघडली होती तब्येत, पहाटे लावले ऑक्सिजन
बीड: प्रतिनिधी
आज सकाळपासून खंडणी प्रकरणातील आरोपी आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मीक कराड याची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. काल रात्री रक्त शर्करा वाढल्याने कराड याची प्रकृती बिघडली. पहाटे त्याला प्राणवायू देण्यात आला. त्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
काल सीआयडीच्या पुणे कार्यालयात वाल्मीक कराड पोलिसांना शरण आला. त्यानंतर त्याला केज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची पंधरा दिवसांसाठी कोठडीत रवानगी केली आहे. कोठडीत असतानाच रात्री त्याच्या रक्त शर्करेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करून त्याला कृत्रिम प्राणवायू देण्यात आला. मात्र, सकाळी त्याची प्रकृती सुधारली आणि त्याची चौकशीही सुरू करण्यात आली.
प्रथम सीआयडीच्या चार अधिकाऱ्यांनी बंद खोलीत त्याची कसून चौकशी केली. दुपारी सीआयडीचे अधीक्षक सचिन पाटील यांनी देखील कराड यांच्याकडे चौकशी केली. कराड याच्या चौकशीतून बीड जिल्ह्यातील अनेक प्रकरणांची रहस्य उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पवनचक्की उभारण्यासाठी खंडणी मागितल्याचा गुन्हा कराड याच्यावर पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्याचप्रमाणे याच प्रकरणी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा अत्यंत निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला. कराड हाच या हत्येमागचा सूत्रधार असल्याचा आरोप होत आहे. कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळेच त्याच्या अटकेला विलंब लागल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात आहे. बीड मधील या सर्व प्रकरणांची चौकशी पूर्ण होऊन आरोप पत्र दाखल होत नाही तोपर्यंत मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना कोणतेही खाते दिले जाऊ नये, अशी मागणी केवळ विरोधकांकडूनच नव्हे तर खुद्द मुंडे यांच्या पक्षाचे आमदार आणि भाजप आमदारांकडूनही केली जात आहे.