- राज्य
- धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर धमकावणीचा उद्योजकाचा आरोप
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर धमकावणीचा उद्योजकाचा आरोप
जयराजे निंबाळकर यांनीदेखील भूखंड घोटाळा केल्याचा दावा
पुणे: प्रतिनिधी
धाराशिव येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओम राजे निंबाळकर यांनी त्यांचे बंधू जयराजे निंबाळकर यांच्या बद्दल तक्रार करणारे उद्योजक दिनेश मांगले यांना भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ केल्याचा व धमकावण्याचा आरोप मांगले यांनी पत्रकार परिषदेत केला. या संदर्भात मांगले यांनी पोलिसांकडे तक्रार देखील केली आहे.
जयराजे निंबाळकर यांनी स्वतःचा भूखंड आपल्याच संबंधातील बँकेकडे गहाण ठेवून माझ्या नावावर अडीच कोटी रुपयांचे कर्ज घेतले. बँकेने ही माझी आर्थिक क्षमता आणि पात्रता नसतानाही हे कर्ज मंजूर केले. ही कर्जाची रक्कम जयराज यांनी स्वतः कडेच ठेवून घेतली व त्यानंतर एकही हप्ता भरला नाही. बँकेने आपल्या मागे वसुलीचा तगादा लावल्याने आपण 34 लाख रुपये भरले, असे मांगले यांनी सांगितले.
मात्र, हे प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने आपण या व्यवहाराची कल्पना खासदार निंबाळकर यांना देण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी आपले कोणतेही म्हणणे ऐकून न घेता उलट आपल्याला धमकी दिली व शिवीगाळ केली, असा मांगले यांचा आरोप आहे. जयराजे यांनी संबंधित भूखंड अन्य 14 जणांना विकून भूखंड घोटाळा केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
कर्ज प्रकरण आणि धमकी याच्या विरोधात आपण कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याचे धोरण स्वीकारल्यानंतर जयराजे यांनी 24 लाख रुपये कर्ज खात्यात भरले आहेत. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला असल्याचेही सांगतानाच आपल्या जीवाला धोका असल्यामुळे आपल्याला संरक्षण मिळावे आणि भूखंड घोटाळ्यातील सर्व आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मांगले यांनी केली.