'परिस्थितीशी झगडून मोठे होण्याचे स्वप्न पहा'

सरन्यायाधीशांच्या मातोश्रींनी जागवला अनाथ मुलींच्या मनात आशेचा किरण

'परिस्थितीशी झगडून मोठे होण्याचे स्वप्न पहा'

माजी लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई यांचा सिंधुताईंच्या लेकींशी भावनिक संवाद

पुणे : प्रतिनिधी

खेडेगावातील शाळेत कष्टाने आणि जिद्दीने शिक्षण घेऊन सरन्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास भूषण गवई यांनी पूर्ण केला. या यशामागे त्यांचे अफाट परिश्रम, सखोल अभ्यास, सातत्य, प्रामाणिकपणा, चिकाटी आणि अडचणींवर मात करण्याची हिम्मत हे गुण आहेत. असे गुण आत्मसात करून विपरीत परिस्थितीतील मुली देखील खूप मोठे स्वप्न पाहू शकतात आणि ते पूर्णही करू शकतात, अशा शब्दात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री डॉ कमलताई गवई यांनी अनाथ मुलींशी भावनिक संवाद साधून त्यांच्या मनात आशेचा किरण जागवला. 

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन, (बालगृह) कुंभारवळण या संस्थेत आयोजित "माय लेकींचा हृदयस्पर्शी संवाद" कार्यक्रमात संस्थेतील मुलींशी कोणतीही औपचारिकता न ठेवता मनमोकळा संवाद साधला. यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष दिपक गायकवाड, ममता सपकाळ, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव सोनल पाटील, आनंदी जगताप, अधिक्षिका स्मिता पानसरे, विनय सपकाळ, सार्थक सेवा संघचे अनिल कुडिया उपस्थित होते.

हे पण वाचा  'अधिकाऱ्यांवरील अरेरावीमुळे राजकीय कार्यकर्त्यांची बदनामी'

सरन्यायाधीश गवई यांच्या जडणघडणीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, सन 1971 दरम्यान भारत बांगलादेश युद्ध सुरू होते. आम्ही फ्रेजरपुरा भागात राहायचो, तेंव्हा सैनिकांसाठी पिठलं - भाकरी भोजनाची व्यवस्था आम्ही केली होती. मला भाकरी बनवायला भूषणची मदत झाली. मी भांडी घासायची, आणि भूषण भांडी धुवायचा. मी स्वैपाक करायचे, भूषण वाढणं करायचा. तिन्ही मुलांमध्ये दोघे भावंड लहान तर भूषण सर्वात मोठा मुलगा. लहानपणी गरजूंना मदत करण्याची आवड त्याच्यामध्ये निर्माण झाली, त्याला वेदनांची किंमत कळते. अशा जबाबदारीमुळे भूषण लहान वयातच परिपक्व झाला. त्याला सामाजिक भान आले. आज मी देशासाठी भूषणला अर्पण केले आहे, तो न्यायदानाचे पवित्र कार्य अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत असल्याचे बघून माझं मन भरून येते, हे सांगत त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.

नेता होण्यापेक्षा आदर्श माता व्हा

नेता होण्यापेक्षा तुम्ही एक आदर्श माता, आई होण्याचा प्रयत्न करा. आज मी माईंच्या संस्थेला भेट देऊन धन्य झाले. माईंनी अनाथ मुलांना संस्कार दिले आहेत. ही संस्था म्हणजे पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांची मायेची सावली आहे.  त्यात अनाथ मुलींनी आपली स्वप्नं रुजवली आहेत, असे त्या म्हणाल्या.

कमलताईंनी या मुलींशी अगदी आईसारखा हळुवार संवाद साधत त्यांचे मन जाणून घेतले. त्यात जशी माया आणि भावनांचा ओलावा होता तसेच  तो प्रेरणादायी आणि आत्मविश्वास वाढवणारा होता.  या संवादाने अनेक मुली भावनाविवश झाल्या. त्यांनी आपल्या मनातील इच्छाना, भीती आणि स्वप्नं कमलताईंकडे हक्काने आणि विश्वासाने व्यक्त केली. संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित पाहुणे यांच्यासाठीही हा क्षण अविस्मरणीय ठरला. या भेटीदरम्यान डॉ. कमलताईंनी माईंच्या लेकींशी अत्यंत हृदयस्पर्शी संवाद साधत त्यांचे मनोबल वाढवले.

मायेची भाषा शब्दांची मोहताज नसते. ती नजरेतून, स्पर्शातून, आणि हृदयातून व्यक्त होते. अशाच एका हृदयस्पर्शी क्षणाला आज ममता बाल सदन साक्षीदार ठरले. आज तुमच्या एका मिठीत एका हास्यात माईंच अस्तित्व पुन्हा जाणवलं...आई कधीच जात नाही. ती दुसऱ्या रूपात परत येते. आज आम्हाला कमलताईंमध्ये आम्हाला आमच्या माई पुन्हा एकदा भेटल्या, अशी भावना ममता सपकाळ यांनी व्यक्त केली.

समाजातील वंचित निराधार निराश्रित लाभार्थीपर्यंत पोहचून त्यांना शासकीय योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण शिबिराच्या माध्यमातून वेळोवेळी कार्यरत राहील, असा विश्वास सचिव सोनल पाटील यांनी व्यक्त केला.

संस्थेतर्फे डॉ. कमलताई गवई आणि विधी सेवा प्राधिकरणच्या सोनल पाटील यांचा तिरंगा ध्वज, सन्मानचिन्ह, तुळशीचे रोप भेट देऊन स्वागत केले. चिमुकल्या मुलींनी स्वागत गीत आणि ऐतिहासिक पोवाडा सादर करून सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश चौधरी आणि सारिका कुंजीर यांनी केले.

अनाथ मुलांना मिळणार आधार कार्ड

समाजातील अनाथ मुलांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना त्यांच्याकडे आधार कार्ड उपलब्ध नसतात किंवा ते आधार कार्ड काढण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो याबाबत पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत ज्या अनाथ मुलांकडे आधार कार्ड नाही अशा मुलांना आधारकार्ड मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या ''साथी कार्यक्रम'अंतर्गत ममता बाल सदन संस्थेत विधी सेवा प्राधिकरणतर्फे आधार कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन माजी लेडी गवर्नर डॉक्टर गवई यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात प्राथमिक स्वरूपात 15 अनाथ मुलांची आधार नोंदणी करण्यात आली आहे. विधी सेवा प्राधिकरण शिबिराच्या माध्यमातून ही अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे नजिकच्या काळात अनाथ मुलांना देखील आधार कार्ड मिळणे सुलभ होणार आहे. 

About The Author

Advertisement

Latest News

Advt