- राज्य
- हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणाला वेगळेच वळण
हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणाला वेगळेच वळण
पाटील हे शासकीय कंत्राटदार नसल्याचा जिल्हा परिषद आणि सरकारचा दावा
सांगली: प्रतिनिधी
तब्बल 80 लाखाचे कर्ज घेऊन जलजीवन मिशनची कामे पूर्ण करूनही एक कोटी चाळीस लाखाचे बिल न मिळाल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केल्यामुळे सरकारवर टीका होत असली तरी देखील या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. हर्षल पाटील हे नोंदणीकृत शासकीय कंत्राटदार नसल्याचा दावा सांगली जिल्हा परिषद आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
हर्षल पाटील हे शासकीय कंत्राटदार असल्याची कोठेही नोंद नाही. त्यांनी घेतलेली कामे सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून घेतलेली असू शकतात, असा दावा सांगली जिल्हा परिषदेने केला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत काम घेतल्याचा कोणताही करारनामा जिल्हा परिषदेकडे उपलब्ध नसल्याचा त्यांचा दावा आहे.
जिल्हा परिषद आणि गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यामुळे आत्महत्याग्रस्त पाटील कुटुंबीयांनी आणि तांदुळवाडी ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जिल्हा प्रशासन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी हर्षल पाटील यांच्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम त्यांनी केल्याचा आरोप केला जात आहे. याबद्दल गुलाबराव पाटील यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांनी शासकीय जलजीवन मिशन अंतर्गत कंत्राट घेऊन गावात नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे काम पूर्ण केले. त्यासाठी भांडवल म्हणून 80 लाखाचे कर्ज देखील घेतले. मात्र, या कामाचे एक कोटी 40 लाख रुपयांचे बिल शासनाकडून वेळेत न मिळाल्याने सावकाराचा तगादा चुकवण्यासाठी त्यांनी आणखी 65 लाखाचे कर्ज घेतले. तरी देखील बिल न मिळाल्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाटील यांनी आत्महत्या केली, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र जिल्हा परिषद आणि गुलाबराव पाटील यांच्या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे.