- राज्य
- 'हर्षल पाटील यांची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध'
'हर्षल पाटील यांची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध'
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल
मुंबई: प्रतिनिधी
शासकीय कंत्राटदार हर्षल पाटील यांनी केलेली आत्महत्या हा सदोष मनुष्यवध असून त्याला कारणीभूत असलेल्या सर्वांवर कारवाई करणार का, असा सवाल करत शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
अशी घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा करण्याऐवजी पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेणे आवश्यक होते, असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.
पाटील यांनी 80 लाखाचे कर्ज काढून जलजीवन मिशन ची सर्व कामे पूर्ण केली. मात्र, त्यांचे एक कोटी 40 लाखाचे बिल सरकारने थकवून ठेवले. हे बिल देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत का, असा सवाल करीत राऊत यांनी ठेकेदारांचे सरकारकडे 80 हजार कोटी रुपये थकीत असल्याचा दावा केला. अनेक ठेकेदारांनी आत्महत्या केल्या. काही ठेकेदारांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे मजा करत फिरत आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केले राज्याचे स्मशान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच फडणवीस यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. वास्तविक त्यांनी महाराष्ट्रात येऊन गेल्या पाच महिन्यात आत्महत्या केलेले शेतकरी आणि तरुण उद्योजक यांच्या कुटुंबीयांना बोलवावे. त्यांची परिस्थिती बघावी. त्यांच्या भावना जाणून घ्याव्या. मुख्यमंत्री आणि त्यांच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी कसे राज्याचे स्मशान केले आहे, याची जाणीव मोदी यांना झाल्याशिवाय राहणार नाही, असेही राऊत म्हणाले.
... हा सुद्धा नक्षलवादच
शहरात नक्षलवाद वाढत असल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकताच गडचिरोली येथे केला. वास्तविक नक्षलवाद सरकार मध्ये आहे. सत्ताधारी पक्षांमध्ये आहे. तुमच्या एका आमदाराच्या भावाने लोकनाट्य कला केंद्रातील नर्तिकेवर गोळीबार केला. कुठून येते एवढी हिम्मत? हा नक्षलवादच आहे ना? खुलेआम मारामाऱ्या सुरू आहेत. सरकारमधील, सत्ताधारी पक्षातील लोकच मारामाऱ्या करत आहेत. हा नक्षलवादच आहे ना? अशा प्रश्नांची सरबत्ती करताना राऊत यांनी सरकारमधील हनी ट्रॅप प्रकरण हा सुद्धा नक्षलवादच असल्याचा दावा केला.