- राज्य
- समृद्धी महामार्गावर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित
समृद्धी महामार्गावर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित
लाड कारंजा आणि मेहकर येथे ऊर्जा निर्मिती सुरू
नागपूर: प्रतिनिधी
राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर लाड कारंजा आणि मेहकर या ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकल्पांची स्थापित क्षमता नऊ मेगावॅट एवढी असून सध्या या दोन्ही प्रकल्पांमध्ये अनुक्रमे तीन आणि दोन मेगावॅट ऊर्जा निर्मिती केली जात आहे.
समृद्धी महामार्गाचे नियोजन करतानाच द्रुतगती वाहतुकीबरोबरच सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या महामार्गावर उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पातून एकूण 204 मेगा वॅट सौर ऊर्जेची निर्मिती करण्याचे नियोजन आहे.
या सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे रस्ते विकास महामंडळाला उत्पन्नाचा एक नवा स्त्रोत उपलब्ध होणार आहे. सौर ऊर्जा निर्मितीसाठी रस्ते विकास महामंडळाने स्थापन केलेल्या महासमृद्धी रिन्युएब्ल एनर्जी लि. या कंपनीचा महावितरण बरोबर वीज पुरवठ्याचा करार झाला आहे. या करारानुसार महावितरणकडून महा समृद्धीला 3 रुपये 5 पैसे प्रति युनिट असा दर दिला जाणार आहे. सौर ऊर्जा निर्मितीमुळे महामंडळाच्या खात्यावर कार्बन क्रेडिट जमा होणार असून त्याचा उपयोग पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करून घेण्यात होणार आहे, असे महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल यांनी संगितले.