- राज्य
- 'पूरग्रस्त भागांना भेटी देऊन मदत कार्याचा आढावा घ्या'
'पूरग्रस्त भागांना भेटी देऊन मदत कार्याचा आढावा घ्या'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पालकमंत्र्यांना आदेश
मुंबई: प्रतिनिधी
राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती असून सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांना भेटी देऊन मदत कार्याचा आढावा घ्यावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना दिले आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीचा आढावा घेतला. राज्यभरात आत्तापर्यंत 975.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा 102 टक्के अधिक आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आवश्यक ते सर्व निर्णय सरकारने घेतले आहेत. सर्व पंचनामे पूर्ण होईपर्यंत सरकार वाट बघणार नाही. जसे जसे पंचनामे होतील तशी तशी मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. राज्यातील 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने 2215 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी 1829 कोटी रुपये संबंधी जिल्ह्यात पोहोचले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
मराठवाड्यात पूरस्थिती गंभीर आहे. बीड आणि धाराशिव येथे बचाव व मदतकार्य सुरू आहेत. धाराशिव जिल्ह्यात 27 जणांना हेलिकॉप्टरने वाचविण्यात आले आहे. 200 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अहिल्यानगर बीड, परभणी, जळगाव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 10 जण जखमी आहेत. या परिसरात केंद्रीय आणि राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या 17 तुकड्या तैनात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
अतिवृष्टी आणि पुरात झालेले मृत्यू, जनावरांचे मृत्यू आणि घरांचे नुकसान याबाबत मदत देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आलेला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
केंद्र सरकारकडून मदत मिळण्यास काही वेळ वाट बघावी लागेल. राज्यातील संपूर्ण नुकसानीचा एकत्रित अहवाल केंद्र सरकारला पाठवावा लागतो. त्यानंतर केंद्र सरकारकडून मदत मिळते. मात्र आपत्कारासाठी सरकारकडून रक्कम मिळालेली असते. ती सध्या आपण खर्च करत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.