- राज्य
- 'आजवर दुष्काळ अनेक बघितले पण...'
'आजवर दुष्काळ अनेक बघितले पण...'
शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची शरद पवार यांची सूचना
मुंबई: प्रतिनिधी
आतापर्यंत अनेक दुष्काळ बघितले मात्र यावर्षी सारखा पाऊस आजपर्यंत कधीही बघितला नाही. अतिवृष्टीने शेतकरी देशोधडीला लागला असून त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजेत, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केली आहे.
यावर्षी महाराष्ट्रात अभूतपूर्व पाऊस पडला आहे. त्याचा परिणाम शेतीवर, गुराढोरांवर आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर झालेला आहे. विशेष म्हणजे जे जिल्हे दुष्काळी म्हणून प्रसिद्ध आहेत त्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. त्या भागात सोयाबीन हे नगदी पीक आहे. मात्र अति पावसाने सोयाबीन कुजून गेले आहे, असे पवार यांनी नमूद केले.
सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, बीड, नांदेड, परभणी, अहिल्यानगर या जिल्ह्यात प्रचंड पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्राच्या योजना आहेत. त्याची अंमलबजावणी राज्यमार्फत केली जाते. राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे, असे पवार म्हणाले.
अति पावसाने जमिनीवरील माती वाहून गेली तर कायमस्वरूपी नुकसान होते. त्यामुळे केवळ पिकाच्या नुकसानीची पाहणी आणि पंचनामे करून पुरेसे नाही. पिकांप्रमाणेच जमीन आणि पाणंद रस्त्याच्या नुकसानाचे पंचनामेही करणे गरजेचे आहे. पूरस्थितीमध्ये अनेक जनावरे वाहून गेली आहेत. त्याचीही नोंद घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तातडीची आणि कायमस्वरूपी मदत देणे आवश्यक आहे, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.