- राज्य
- Vadgoan Maval | पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध
Vadgoan Maval | पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध
मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन
वडगाव मावळ/ प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गावगुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. याबाबत मंगळवारी (दि.२४ ) रोजी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांतनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मिडियाचे पत्रकार श्री. योगेश खरे, श्री. अभिजीत सोनवणे व श्री. किरण ताजने यांच्यावर एका ठेकेदाराच्या गुंडांकडून भ्याड हल्ला करून त्यांना गंभीर दुखापत करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर आघात झाला असून पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे,सदर आरोपींवर तात्काळ मोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा.ए. एस. मल्टी सर्व्हिसेस कंपनीचा संबंधित ठेकेदार याच्याविरोधातही गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी.सदर कंपनीला काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे.
शासनाने त्वरीत व कडक कारवाई करून पत्रकारांना न्याय मिळवून द्यावा. अन्यथा न्याय न मिळाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
तसेच,लोणावळा येथील पत्रकार श्री. विशाल पाडाळे यांनी केलेल्या बातमीत छेडछाड करून प्रसारित करण्यात आले आहे. या प्रकरणीही संबंधित इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे
यावेळी मावळ तालुका मराठी पत्रकार संघ, वडगाव शहर पत्रकार संघ, तळेगाव दाभाडे शहर, लोणावळा शहर व तळेगाव दाभाडे प्रेस फाऊंडेशन, देहूरोड पत्रकार संघ, कामशेत पत्रकार संघ, पवनमावळ पत्रकार संघ या विविध पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About The Author
