- राज्य
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 'मंडल यात्रा' स्थगित
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 'मंडल यात्रा' स्थगित
पक्षाच्या ओबीसी विभाग प्रमुखांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट
मुंबई: प्रतिनिधी
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राज्यभरात आयोजित केलेली 'मंडल यात्रा' स्थगित केली आहे. त्यानंतर पक्षाच्या इतर मागास विभागाचे अध्यक्ष राज राजापूरकर यांनी मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरागे पाटील यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली.
मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपूर व अन्य ठिकाणी साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा इशाराही ओबीसी नेत्यांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर मराठा आणि ओबीसी या दोन समाज घटकांमध्ये वितुष्ट वाढू नये आणि राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मंडल यात्रा स्थगित करत असल्याचे, राजापूरकर यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी इतर मागासवर्गीयांसाठी काय कार्य केले आणि कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले, याची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.