- राज्य
- मुंबई आयआयटीमध्ये अगंतुकाची घुसखोरी
मुंबई आयआयटीमध्ये अगंतुकाची घुसखोरी
हेरगिरीच्या संशयावरून कसून चौकशी सुरू
मुंबई: प्रतिनिधी
भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या मुंबई आयआयटी या संस्थेमध्ये एका आगांतुकाने घुसखोरी करून तब्बल 14 दिवस मुक्काम ठोकल्याचे उघड झाले आहे. इतक्या महत्त्वाच्या संस्थेत झालेली ही घुसखोरी तपास यंत्रणांनी गांभीर्याने घेतली असून हेरगिरीची शक्यता लक्षात घेऊन कसून तपास केला जात आहे.
मुंबई आयआयटीच्या साडेपाचशे एकर एवढ्या विस्तीर्ण परिसरामध्ये पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडीचे एकूण 13 हजार विद्यार्थी राहतात. आयआयटीच्या आवारात एका विद्यार्थ्याबाबत संशय आल्याने प्राध्यापक शिल्पा कोटीकल यांनी त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. मात्र, ओळखपत्र न दाखवता संशयित त्या ठिकाणाहून पळून गेला. संबंधित प्राध्यापकांनी या प्रकाराची कल्पना आयआयटीच्या सुरक्षा यंत्रणेला दिली. संपूर्ण परिसरात शोध घेऊन देखील संशयित सापडला नाही.
17 जून रोजी प्रा कोटीकल यांनीच त्याला एका वर्गात बसलेले पाहिले. तो सराईतासारखा विद्यार्थ्यांमध्ये मिळून मिसळून वागताना दिसला. प्रा कोटिकल यांनी त्वरित सुरक्षारक्षकांना पाचारण केले. त्यांनी संशयिकाकडे कसून चौकशी केली असता तो मंगळुरू येथे राहणारा असून त्याचे नाव बिलाल अहमद फयाज अहमद तेली (वय 22) असल्याचे उघड झाले. आयआयटी मुंबईच्या सुरक्षा विभागाने त्याला ताब्यात घेऊन पवई पोलिसांकडे सोपविले आहे.
बिलाल याने दोन ते सात जून आणि 10 ते 17 जून या कालावधीत आयआयटीमध्ये घुसखोरी केल्याची आणि विविध वसतिगृहात राहिल्याची कबुली दिली आहे. त्याचा आयआयटीमध्ये येण्याचा उद्देश काय? तो संस्थेत घुसखोरी कशी करू शकला आणि वसतिगृहात कसा राहिला, याचा पोलीस तपास करत आहेत. त्याचप्रमाणे गुप्तचर यंत्रणांना देखील यासंबंधी माहिती देण्यात आली आहे.