- राज्य
- सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्र महोत्सव घोषित केल्याबद्दल जल्लोष
सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्र महोत्सव घोषित केल्याबद्दल जल्लोष
कसबा गणपतीची आरती करून कार्यकर्त्यांनी भरवले पेढे
पुणे: प्रतिनिधी
सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्र महोत्सव घोषित करण्याच्या सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या ऐतिहासिक घोषणेनंतर पुण्यात गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीची आरती करून एकमेकांना पेढे भरविण्यात आले.
कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या मागणीची दखल घेऊन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे.
थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांनी जनसंघटन आणि प्रबोधन या दृष्टिकोनातून पुण्यापासूनच सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि तो देशभर विस्तारला. या गणेशोत्सवाला राष्ट्रीय भावना, एकात्मता, समाजसेवा, प्रबोधन यांची जोड असून आजही गणेशोत्सव त्याच प्रकारे साजरा होत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला महाराष्ट्र महोत्सव घोषित करीत असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात अनेक प्रकारे अडथळे आणले गेले होते. विशेषतः एका याचिकेचा निकाल देताना तर पोलीस आणि प्रशासन सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी देऊच शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. मात्र, महायुती सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येणारे सर्व अडथळे दूर केले आहेत, असे शेलार यांनी सांगितले.