- राज्य
- '... तर विकासकांवर कठोर कारवाई करू'
'... तर विकासकांवर कठोर कारवाई करू'
मंत्री शंभूराज देसाई यांचा स्पष्ट इशारा
मुंबई: प्रतिनिधी
मुंबईत मराठी माणसाला घर नाकारण्याच्या अनेक तक्रारी येत असून मराठी माणसाला घर नाकारल्यास संबंधित विकासकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत बोलताना दिला.
मराठी माणसांना मुंबईत घर नाकारण्याचे प्रकार घडत असल्याकडे मिलिंद नार्वेकर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे लक्ष वेधले. याशिवाय पारले पंचम या संस्थेने मुंबईतील घरांसाठी मराठी माणसांना 50 टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने उत्तर दिले.
मुंबईत मराठी माणसांना प्राधान्याने घरे उपलब्ध व्हावीत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र विचार विनिमय करणार असून लवकरच त्याबाबत धोरण निश्चित केले जाईल, अशी ग्वाही देसाई यांनी सभागृहात दिली.
मुंबई शहर आणि उपनगरात मराठी माणसांना घर नाकारण्याचा अधिकार कोणालाही नाही. तशी तक्रार आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगतानाच मुंबईत प्रथम अधिकार मराठी माणसाचाच, हे देसाई यांनी आवर्जून अधोरेखित केले.