- राज्य
- 'गणेशोत्सव लवकरच होणार महाराष्ट्राचा उत्सव'
'गणेशोत्सव लवकरच होणार महाराष्ट्राचा उत्सव'
आमदार हेमंत रासने यांच्या मागणीला प्रतिसाद देत आशिष शेलार यांची ग्वाही
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्राचे सर्वच भागात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव हा आता महाराष्ट्राचा उत्सव म्हणून साजरा केला जाईल. लवकरच त्याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात बोलताना दिली. या संदर्भात आमदार हेमंत रासने यांनी मागणी केली होती.
या प्रश्नाबद्दल शेलार यांनी आमदार रासने यांचे आभार मानले. लोकमान्य टिळकांनी सन 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्याला राष्ट्रीय, सामाजिक, स्वातंत्र्य, स्वाभिमान, स्वभाषा या मूल्यांची व्यापक पार्श्वभूमी होती. आजही गणेशोत्सव त्याच पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे यापुढील काळात सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून साजरा केला जाईल, याची ग्वाही मी आज याच ठिकाणी देऊ इच्छितो, असे शेलार म्हणाले.
या उत्सवात खोडा घालण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. न्यायालयात एका याचिकेचा निकाल देताना तर अशी मांडणी करण्यात आली होती की पोलीस आणि प्रशासनाला या उत्सवाला परवानगी देता येऊच नये. मात्र, महायुती सरकारने या चैतन्य मुळे उत्सवाचे सर्व अडथळे दूर केले आहेत. आता हा उत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून साजरा होईल, असे शेलार यांनी स्पष्ट केले.