- राज्य
- न्यायवैद्यक प्रयोगशाळा करणार प्रलंबित चाचण्यांचा निपटारा
न्यायवैद्यक प्रयोगशाळा करणार प्रलंबित चाचण्यांचा निपटारा
रोज चार अधिक काम, शनिवारची सुट्टीही रद्द
मुंबई: प्रतिनिधी
न्यायदानाच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावत असलेल्या न्यायवैद्यक विभागाने प्रलंबित चाचण्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यातील सर्व न्यायवैद्यक प्रयोगशाळांमध्ये रोज चार तासांपर्यंत अधिक कामकाज केले जात असून शनिवारची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायदान प्रक्रियेलाही वेग मिळण्यास मदत होणार आहे.
न्यायदान प्रक्रियेत न्यायवैद्यक प्रयोगशाळांची भूमिका महत्त्वाची आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळांनी विविध चाचण्यांच्या दिलेल्या अहवालावर पोलिसांचा तपास आणि त्याचा कालावधी मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. त्यामुळे न्यायवैद्यक प्रयोगशाळांनी आपल्या कामाचा वेग वाढविल्यास न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
सध्याच्या काळात राज्यातील सर्व न्यायवैद्यक प्रयोगशाळांमध्ये मिळून एक लाख तीस हजार पेक्षा अधिक प्रकरणातील चाचण्या आणि तपासण्या प्रलंबित आहेत. मात्र, तीन महिन्याच्या कालावधीत प्रलंबित तपासण्याचे प्रमाण 70 टक्के कमी करून दाखविण्याचा न्यायवैद्यक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा निर्धार आहे. त्याचप्रमाणे व्हिसेरा अहवाल देण्यासाठी सध्या लागत असलेला तीन महिन्यांचा कालावधी 45 दिवसांपर्यंत कमी करण्याचाही न्यायवैद्यक विभागाचा प्रयत्न आहे. न्यायवैद्यक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे न्यायदान प्रक्रियेला वेग येण्यास मोठी मदत होणार आहे.