- राज्य
- महिन्याभरात न्याय मिळाला नाही तर...
महिन्याभरात न्याय मिळाला नाही तर...
ज्ञानेश्वरी मुंडे यांचा तपासयंत्रणांना इशारा
बीड: प्रतिनिधी
आपल्या पित्याच्या हत्येचा सूड घेण्याची भावना मुलांच्या मनात वाढीला लागली असून ती दूर करण्यासाठी आपल्याला न्याय मिळणे आवश्यक आहे. एक महिन्यात आपल्याला न्याय मिळाला नाही तर आपले जगणे व्यर्थ आहे. त्यामुळे आपण आपले जीवन संपवू, असा इशारा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी तपास यंत्रणांना दिला आहे.
आपल्या पतीच्या हत्येचा योग्य तपास होत नसल्याचा आरोप करून ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विषप्राशन केले आणि आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची तहसील कार्यालयासमोर २२ ऑक्टोबर २०२३ रोजी हत्या करण्यात आली. मात्र, या प्रकरणात अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. या प्रकरणाचा योग्य तपास व्हावा, यासाठी मुंडे कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. ही भेट सकारात्मक होती. मात्र, प्रत्यक्ष तपासात कोणतीही प्रगती झाली नाही, असा ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आरोप आहे.
बंगल्यावरून फोन आणि वाल्मीक कराडचा हस्तक्षेप
आपल्या पतीच्या हत्येचा तपास थांबण्यामागे एक दूरध्वनी कारणीभूत आहे. परळीच्या बंगल्यावरून दूरध्वनी आला आणि आपल्या पतीच्या हत्येचा तपास थांबला. त्यावेळी सर्व कारभार वाल्मीक कराड हा पाहत होता. त्यामुळे या प्रकरणात वाल्मीक कराड याची देखील चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे.