- राज्य
- प्राडाच्या विरोधातील जनहित याचिका फेटाळली
प्राडाच्या विरोधातील जनहित याचिका फेटाळली
कंपनीचे पथक कोल्हापुरात असताना उच्च न्यायालयाचा निर्णय
कोल्हापूर: प्रतिनिधी
प्राडा कंपनीचे पथक कोल्हापुरात हस्तकला कारागिरांशी चर्चा करण्यासाठी असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने कंपनीच्या विरोधात दाखल केलेली जनहित याचिका फेटाळली आहे. याचिकाकर्त्यांना या प्रकरणात न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे का, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला.
प्राडा या फॅशन उत्पादनांच्या इटालियन कंपनीने कोल्हापुरी चपलांची नक्कल करून स्वतःचे उत्पादन विकसित केल्याचा आरोप करीत सहा वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात कंपनीच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. कोल्हापुरी चपलांना भौगोलिक मानांकन आहे. त्यामुळे त्याची नक्कल करणाऱ्या कंपनीने कोल्हापुरी चपला उत्पादकांची जाहीर माफी मागावी तसेच त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या होत्या.
मात्र, या प्रकरणात जनहित काय, याचिका करते हे कोल्हापुरी चपलांचे मालक नाहीत. मग त्यांना कंपनीच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे का, असा सवाल करीत मुख्य न्यायाधीश अलोक आराध्ये आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.
प्राडा कंपनीने आपल्या चपलांचे डिझाईन कोल्हापुरी चपलांपासून प्रेरणा घेऊन केले असल्याचे मान्य केले आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर चपलांसह चांदीचे पैंजण, पैठणी यासारख्या उत्पादनांमध्ये स्थानिक कारागिरांशी करार करण्यास रस दाखवला आहे. त्यासाठीच कंपनीचे पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे.