राज्यात बोगस पॅथॉलॉजी लॅब्सचा सुळसुळाट सुरूच
जनतेचे आरोग्य सरकारी आश्वासनाच्या दावणीला
मुंबई / रमेश औताडे
मागील पावसाळी अधिवेशनात मंत्री उदय सामंत यांनी बोगस पॅथॉलॉजी लॅब्स लवकरच बंद करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता हिवाळी अधिवेशन महिन्याभरात सुरू होईल. मात्र मागील अधिवेशनात दिलेल्या आश्वासनांचे घोंगडे तसेच भिजत पडल्याने आजही राज्यात बोगस पॅथॉलॉजी लॅब्सचा सुळसुळाट सुरूच आहे. सरकारने जनतेचे आरोग्य आश्वासनाच्या दावणीला बांधल्याने राज्यातील जनतेच्या आरोग्याचा खेळ सुरूच आहे.
सरकारकडून आरोग्य धोरणात जोरदार घोषणा करण्यात येत असताना प्रत्यक्षात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या या लॅब्सवर कारवाई होताना दिसत नाही. पॅथॉलॉजी लॅब संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदिप यादव यांनी सरकारकडे या लॅब्सना त्वरीत बंदीची मागणी करत स्पष्ट केले की, सरकारकडून केवळ अधिवेशनात आश्वासने दिली जातात, प्रत्यक्षात काहीच ठोस कृती केली जात नाही.
डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केवळ पॅथॉलॉजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या नॉन-ऑलोपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांनाच लॅब चालवण्याची परवानगी आहे. मात्र आजही राज्यभरात अनधिकृत लॅब्स चालू आहेत.
या बोगस लॅब्समुळे चुकीचे निदान, उपचार आणि रुग्णांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. चुकीच्या रिपोर्टमुळे केवळ आरोग्याचेच नव्हे तर रुग्णांच्या आर्थिक स्थैर्यावरही मोठा परिणाम होतो, असे सांगताना डॉ.संदीप यादव यांनी सांगितलं की, सरकार या प्रकरणी गंभीर का नाही ?
सरकारची निष्क्रियता हिवाळी अधिवेशनात पुन्हा उघड होणार?
बोगस लॅब्सवर कारवाई करण्याचे सरकारचे आश्वासन जर पुन्हा हिवाळी अधिवेशनात दिले गेले, तर ते जनतेच्या आरोग्याशी खेळणे ठरेल. नागरिकांचे आरोग्य दावणीला लावत फक्त आश्वासनांवर वेळकाढूपणा करणाऱ्या यंत्रणांवर कधी कारवाई होणार, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
000