- राज्य
- 'मराठवाडा मुक्ती दिनापूर्वी प्रक्रिया सुरू करा, अन्यथा...'
'मराठवाडा मुक्ती दिनापूर्वी प्रक्रिया सुरू करा, अन्यथा...'
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
छत्रपती संभाजी नगर: प्रतिनिधी
हैदराबाद गॅझेटीयरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यास 17 सप्टेंबर या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्यापूर्वी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करावी. अन्यथा मराठा समाज मोठा निर्णय घेऊन पुन्हा रस्त्यावर उतरेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
जरांगे पाटील यांनी आंदोलकांसह मुंबईत ठाण मांडून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केल्यावर राज्य सरकारने त्यांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्या. त्यामध्ये हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या महत्त्वाच्या मागणीचा समावेश आहे. त्यासाठी राज्य सरकारने शासन आदेश देखील जारी केला आहे. त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे.
हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या शासन निर्णयाला ओबीसी समाजाचा विरोध आहे. राज्यभरातील ओबीसी नेत्यांच्या वतीने पुढील दोन दिवसात मंत्री छगन भुजबळ हे या शासन निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. याबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, आंदोलकांच्या प्रयत्नातून साकारलेला शासन निर्णय इतका प्रभावी आहे की त्यामुळे विरोधकांची झोप उडली आहे. मात्र, विजय पचवावा लागतो आणि पराजयही पचवावा लागतो. त्यामुळे समाजाने संयम बाळगावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.
हैदराबाद गॅझेत्यार लागू झाल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीरपणे दिली आहे. त्यांनी आता त्याची अंमलबजावणी देखील त्वरित सुरू करावी. अन्यथा दसरा मेळाव्यात आम्हाला सरकार विरोधी भूमिका घेणे भाग पडेल, असा इशाराही जरांगे यांनी दिला.
तुम्ही आमच्या मुळावर उठलात तर...
भुजबळ यांनी मागणी केली म्हणून हैदराबाद गॅझेटियरच्या शासन निर्णयात फेरफार केल्यास खपवून घेतले जाणार नाही. एखादा शब्द बदलणे गरजेचे असेल तर तो बदल सरकारने करावा. मात्र, त्या शासन निर्णयानुसार आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, हाच आमचा आग्रह आहे, असे जरांगे म्हणाले. या शासन आदेशाला जर कोणी आव्हान देणार असेल तर आम्ही देखील 1994 च्या शासन निर्णयाला आव्हान देऊ. तुम्ही आमच्या मुळावर उठलात तर आम्ही देखील तुमच्या मुळावर उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.