- राज्य
- देशाच्या प्रगतीसाठी एकत्र येऊन काम करा: माजी लष्करप्रमुख नरवणे
देशाच्या प्रगतीसाठी एकत्र येऊन काम करा: माजी लष्करप्रमुख नरवणे
संस्कृती प्रतिष्ठान आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ संपन्न
पुणे: प्रतिनिधी
देशाला २०४७ मध्ये महासत्ता बनवायची आहे. त्यासाठी आपण जे काही काम करु ते नियमाप्रमाणे करु, देशाच्या प्रगतीसाठी करु, ही भावना आपल्या आतून यायला हवी. करिअरसाठी जे क्षेत्र निवडाल तिथे चांगले काम करा, असे आवाहन करत स्वातंत्र्याबरोबर आलेल्या जबाबदारीचे भान ठेवा, असा मौलिक सल्ला आणि आवाहन भारतीय सैन्यदलाचे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी केले.
संस्कृती प्रतिष्ठान च्यावतीने गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ कोथरुड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय सैन्यदलाचे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी सातशे गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या उपक्रमाचे यंदाचे हे २३ वे वर्षे होते. स्वामी विवेकानंद आणि पंतप्रधान मोदी यांचे पुस्तक, शैक्षणिक साहित्य आणि सन्मान चिन्ह असे सन्मानाचे स्वरूप होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव, सिने दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रीजमोहन पाटील, मोनिका मोहोळ, हर्षाली माथवड, वासंती जाधव, संस्कृती प्रतिष्ठानचे व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे म्हणाले की, “ज्या क्षेत्रात असाल तिथे प्रामाणिकपणे, शिस्तीने काम केले तरी ते देशाच्या प्रगतीसाठी केलेले काम असेल. शिस्त नसेल तर त्या स्वातंत्र्याचा काहीही उपयोग नाही. स्वातंत्र्य मिळाल्यामुळेच आपण सर्व आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करतो, आपल्या आवडीनुसार आवडत्या क्षेत्रात काम करतो. पण हे स्वातंत्र्य उपभोगताना त्याबरोबर आलेल्या जबाबदारीला विसरुन चालणार नाही.”
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ‘आपल्या तरुणांचे भवितव्य उज्ज्वल आहे. हीच तरुण पिढी भारताला पुढे नेईल. आपल्या देशाला सर्वोच्च स्थानी पोहचविण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पाहिले आहे. ते पूर्ण करण्यासाठी, ज्यांच्या मागे कोणी नाही, अशा एक लाख विद्यार्थ्यांना पुढे आणण्याचा आपला प्रयत्न आहे. या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आपल्याला भारताचे भविष्य उज्ज्वल करायचे आहे. गुणवंत विद्यार्थी प्रतिभावंत कसे होतील, यासाठी हा प्रयत्न आहे. ज्यांना मी २३ वर्षापूर्वी गुणवंत म्हणून वह्या दिल्या त्यांची मुले आज बक्षिसे घ्यायला आली आहेत’
सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर निश्चितच पुढे जाऊ शकतात. शिस्त डोक्याला लावा. शिस्त, सकारात्मक दृष्टिकोन, सकारात्मक मानसिकता यश मिळवून देईल, असे सांगत क्रिकेटपटू केदार जाधव याने आपल्या यशाचे रहस्य विद्यार्थ्यांना सांगितले. केदार जाधव म्हणाले की, दहावीनंतर मी व्यावसायिक क्रिकेटकडे वळालो. माझ्या क्षेत्रात बेस्ट व्हायचे आहे. ह्या ध्येयाने मी काम करत होतो. एके दिवशी स्नायूला दुखापत झाल्यामुळे मी छोट्या धावा घेत खेळत होतो. माझे प्रशिक्षक मला म्हणाले तु स्लो का खेळतोय. तेव्हा मी म्हणालो, हे माझे घरचे मैदान आहे. जेव्हा ताकद दाखवायची तेव्हा दाखवेल. त्यावेळी माझे प्रशिक्षक माझ्याकडे पाहून हसले. त्यानंतर प्रत्यक्ष मैदानात उतरल्यावर पहिला चेंडू मी सावधानतेने खेळलो. संरक्षणात्मक पवित्र्यात खेळलो. मात्र नंतर दुसऱ्याच चेंडूवर चौकार मारला.
प्रसिध्द अभिनेते प्रविण तरडे म्हणाले की, प्रयत्नातील सातत्याने तुम्ही यशाची पायरी चढू शकता. जबाबदारीने महाविद्यालयाची पायरी चढा. जे काही करायचे त्यासाठी आत्ताच ठरवा. तर तुम्ही यशस्वी व्हाल. स्वतः ला घडविण्यापेक्षा अवघड काही नाही. आपल्याला मिळालेल्या पुरस्कार मिळाल्यानंतर मुरलीधऱ मोहोळ यांनी पहिला सत्कार केला होता याची आठवण तरडे यांनी यावेळी सांगितली. सायबर सिक्युरिटी मध्ये काम करणा-या राधिका पानट या विद्यार्थीनीचा यावेळी सत्कार करण्यात आला.
श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील यांनी ड्रग्स, पार्टी यामुळे पुण्याची बदनामी झाली आहे याचा उल्लेख करत, नशेला, वाईट गोष्टींना निर्धाराने नाही म्हणण्याचे आवाहन केले. पुण्याचे कारभारी या नात्याने मोहोळ यांनी, पुढील पाच वर्षांत पुणे मनपा शाळा भौतिक व गुणवत्ता दृष्टीने सक्षम होण्यासाठी तसेच पुण्यामधील आठ विधानसभा मतदारसंघात समुपदेशन केंद्र सुरू करावेत. असे आवाहन केले
सुत्रसंत्रलन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. हर्षल दारकुंडे यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.