'शांततापूर्ण गणेश विसर्जनासाठी सहमतीने धोरण निश्चित करावे'

संदीप खर्डेकर यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी 

'शांततापूर्ण गणेश विसर्जनासाठी सहमतीने धोरण निश्चित करावे'

पुणे: प्रतिनिधी 

गणेश विसर्जन मिरवणूक शांततेने, सौहार्दाने आणि पावित्र्य पूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि गणेशोत्सवाशी संबंधित प्रतिष्ठित नागरिक यांच्याशी संवाद साधून सर्व घटकांच्या सहमतीने धोरण निश्चित करावे, अशी मागणी गणेशोत्सवातील ज्येष्ठ कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे. 

गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपतीनंतर सहभागी होण्याबाबत मतभेदांना सुरुवात झाली आहे. भाऊसाहेब रंगारी मंडळ आणि अखिल मंडई मंडळ यांनी बाणाच्या गणपतीपाठोपाठ मिरवणुकीत येणार असल्याचे जाहीर केले आहे. 

या मंडळाच्या परस्पर घोषणेला अनेक मंडळांनी विरोध व्यक्त केला आहे तर अनेक मंडळाच्या प्रतिनिधींनी सकाळी सात वाजताच मिरवणूक सुरू करण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली आहे.

हे पण वाचा  'लाडकी बहीण योजनेत 4 हजार 800 रुपयांचा भ्रष्टाचार'

या संदर्भात पोलीस आयुक्तांनी मिरवणुकीपूर्वीच संबंधितांची बैठक घेऊन मिरवणुकी संदर्भात सहमतीने धोरण निश्चित करावे आणि शांततेचा भंग होणार नाही अशा दृष्टीने संवाद निर्माण करावा, असे आवाहन खर्डेकर यांनी केले आहे. 

याशिवाय मिरवणुकीतील डीजेच्या आवाजाच्या पातळीवर, डोळ्यांसाठी हानिकारक ठरणाऱ्या लेझर बीमवर नियंत्रण ठेवावे, मंडळाचे कार्यकर्ते नसलेल्या मात्र मिरवणुकीत नर्तनाची हौस भागविणाऱ्या मंडळींमुळे मिरवणूक रेंगाळण्याच्या प्रकारांना आळा घालावा, अश्लील हावभाव करून नाचणाऱ्यांना रोखावे, ढोल, ताशा, टिपरी पथकातील वादकांची संख्या व त्यांचा अती उत्साह मर्यादित ठेवावा, पोलीस मित्रांच्या नावाखाली होणारी दादागिरी रोखावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. 

निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांचे पथक तैनात करावे

सध्याच्या काळात पुणे पोलीस दलात बहुतेक अधिकारी नव्याने पुण्यात नियुक्ती झालेले आहेत. त्यांची पुण्यातील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची ओळख अथवा संवाद नाही. मिरवणुकीत गर्दीच्या मानसिकतेमुळे अनेकदा पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात वाद निर्माण होत असतो. या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे पथक तयार करून त्यांना मिरवणुकीच्या बंदोबस्तात सहभागी करून घ्यावे, अशी सूचना ही खर्डेकर यांनी पोलीस आयुक्तांना केली आहे.

About The Author

Advertisement

Latest News

Advt