- राज्य
- 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर नाही चालू देणार डान्स बार'
'छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर नाही चालू देणार डान्स बार'
मनसैनिकांनी उद्ध्वस्त केला 'नाइट रायडर्स' बार
नवी मुंबई: प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीवर डान्स बार चालू देणार नाही, अशी घोषणा करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पनवेल येथील नाईट रायडर्स हा बार उद्ध्वस्त केला. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यात सर्वाधिक डान्स बार असल्याबद्दल खंत व्यक्त केली होती.
डान्स बारवर बंदी असून देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमुळे रायगड नाव मिळालेल्या जिल्ह्यातच सर्वाधिक डान्सबार अवैधरित्या सुरू असल्याबद्दल राज ठाकरे यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात खंत व्यक्त केली होती. त्यानंतर मनसैनिकांनी नाईट रायडर्सवर हल्ला चढवला.
डान्सबारमुळे स्थानिकांचे आयुष्य धुळीला मिळत आहेत तर त्यातूनच बाहेरून आलेले हॉटेल व्यवसायिक बक्कळ पैसा कमवत आहेत, याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधले. त्याची प्रतिक्रिया म्हणून पनवेल मधील बारवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. हिंदी सक्तीला विरोध करण्याप्रमाणेच अवैध डान्सबार बंद करण्याचा विषय या पुढील काळातही मनसे लावून धरणार का, याबद्दल राजकीय वर्तुळातच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील उत्सुकता आहे.