- राज्य
- सरकार साजरा करणार धरणाचा शताब्दी महोत्सव
सरकार साजरा करणार धरणाचा शताब्दी महोत्सव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
मुंबई: प्रतिनिधी
भंडारदरा धरणाच्या उभारणीला पुढील वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने राज्य सरकार या धरणाचा शताब्दी महोत्सव साजरा करणार आहे. या महोत्सवाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती ही स्थापन करण्यात आली असून ती सहा महिन्यात आपले काम पूर्ण करणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांचा कायापालट करणाऱ्या प्रवरा नदीवरील भंडारदरा धरणाचे नाव शासकीय नोंदीनुसार क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे आहे. इंग्रजांच्या राजवटीत सन 1910 मध्ये या धरणाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. ते 1926 मध्ये पूर्ण झाले. अर्थातच सन 2026 हे या धरणाचे शताब्दी वर्ष आहे.
या वर्षा निमित्त कोणकोणते कार्यक्रम आयोजित करता येतील, धरण परिसरात पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे शक्य आहे, जलाशयाचे संरक्षण आणि संवर्धन कशाप्रकारे करता येईल, याबाबत फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील समिती अभ्यास करणार आहे.
या समितीत फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, राज्याचे मुख्य सचिव, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि सचिव यांचाही या समितीत समावेश आहे.
भंडारदरा धरणामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहता श्रीरामपूर आणि नेवासा या तालुक्यांना भरीव सिंचन सुविधा प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या तालुक्यांमध्ये शेतीच्या विकासाबरोबरच सहकार क्षेत्र आणि उद्योगांचाही विकास झाला आहे. भंडारदरा हे पर्यटकांचे देखील एक आकर्षण केंद्र आहे.