- राज्य
- सात बारा कोरा करण्यासह अन्य मागण्यांसाठी 'प्रहार' रस्त्यावर
सात बारा कोरा करण्यासह अन्य मागण्यांसाठी 'प्रहार' रस्त्यावर
आंदोलन दडपण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांच्या धरपकडीचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी
संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा, या मागणीसह दिव्यांग, शेतमजूर, ग्रामपंचायत कर्मचारी, मच्छीमार, मेंढपाळ यांच्या समस्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू आक्रमक झाले असून त्यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष रस्त्यावर उतरला आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी सरकारने प्रहारच्या शेकडो कार्यकर्त्यांची धरपकड केल्याचा पक्षाचा आरोप आहे.
शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे या व अन्य मागण्यासाठी बच्चू कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याच्या समाधीसमोर यापूर्वी आमरण उपोषण केले होते. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडू यांची भेट घेऊन सरकार त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. कडू यांनी सहा दिवसानंतर आपले उपोषण मागे घेतले. मात्र या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी पश्चिम विदर्भातील जिल्ह्यातून पदयात्रा आयोजित केली.
यादरम्यान सरकारकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याचा आरोप करून बच्चू कडू यांनी आज चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सतत पेटता रहावा, अशी खुद्द सरकारची इच्छा आहे. त्यामुळेच सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि अन्य मागण्यांबबत कोणतीही ठोस पावले उचलत नाही, असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.
हे आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने आपल्या कार्यकर्त्यांना उचलून गजाआड करण्याचे काम केले आहे. मात्र त्यामुळे हे आंदोलन दडपले जाणार नाही. उलट त्यामुळे या आंदोलनाची धग वाढेल आणि ते थोपवणे सरकारच्या हातात राहणार नाही, असा इशाराही कडू यांनी दिला आहे.