- राज्य
- 'पंचाहत्तरीनिमित्त अंगावर शाल पांघरली याचा अर्थ...'
'पंचाहत्तरीनिमित्त अंगावर शाल पांघरली याचा अर्थ...'
सरसंघचालकांनी करून दिली मोरोपंतांच्या विधानाची आठवण
नागपूर: प्रतिनिधी
पंचाहत्तरी निमित्त झालेल्या सन्मान प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि कृतिशील विचारवंत मोरोपंत पिंगळे यांनी नमूद केले होते की, या निमित्ताने शाल अंगावर पांघरण्यात आली याचा अर्थ, आता तुम्ही दूर व्हा आणि पुढचे कार्य आम्हाला करू द्या. मोरोपंतांच्या या विधानाची आठवण सरसंघचालक मोहन भागवत यांनी करून दिली.
साप्ताहिक विवेकची निर्मिती असलेल्या आणि मंदार मोरोणे, प्रांजली काणे यांनी लिहिलेल्या, 'मोरोपंत पिंगळे: द आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स' या चरित्राचे प्रकाशन सरसंघचालकांच्या हस्ते करण्यात आले.
कोणतेही कार्य निश्चित करण्याचे ठरवून ते पार पाडण्यासाठी दृढनिश्चय लागतो. मोरोपंतांच्या चरित्रात अनेक ठिकाणी तो आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्यासमोर त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा कोणी उल्लेख केला तर ते स्वतःच हसण्यावारी नेत. संघाच्या चरणी संपूर्ण समर्पण, असे स्वयंसेवकाचे जीवन असले पाहिजे. मोरोपंतांचे चरित्र हा त्याचा वस्तुपाठ आहे, असे भागवत यांनी नमूद केले.
मोरोपंतांनी आयुष्यभर कामाचा डोंगर उभा केला. अखेर वय झाले. शरीर थकले. आता बाजूला व्हा आणि इतरांवर कार्य सोपवा, असे सांगण्यात आल्यावर अगदी सहजपणे बाजूला झाले. त्यानंतर ते नागपूरला येऊन राहिले. त्यांना सगळ्याच गोष्टींची खडान खडा माहिती होती. आम्ही वारंवार सल्ला घ्यायला जात असू. आवश्यक ते मार्गदर्शन करायचे. काही नवीन कल्पना सुचवायचे. एखादे काम करण्यासाठी योग्य माणूस सापडला की लगेच त्याला बसल्या बसल्या कामाला लावायचे, अशा आठवणींना भागवत यांनी उजाळा दिला.