- राज्य
- 'ठाकरे यांचा हिंदी विरोध सत्तालालसे पोटीच'
'ठाकरे यांचा हिंदी विरोध सत्तालालसे पोटीच'
ठाकरे यांचे पूर्वज बिहार मधून आल्याचा स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा दावा
मुंबई: प्रतिनिधी
ठाकरे बंधूंचा हिंदीविरोध आणि मराठी प्रेम हे बेगडी आणि सत्तलालसेपोटी आहे. आगामी महापालिका निवडणुका एकूणच महाराष्ट्राची सत्ता नजरेसमोर ठेवून ठाकरे बंधू हिंदीला विरोध करीत असल्याचा दावा ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केला. त्याचप्रमाणे ठाकरे घराणे मूळचे मराठी नसून हे मगध बिहार येथील असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
त्रिभाषा सूत्रांतर्गत पहिलीपासून हिंदी तिकडे अनिवार्य करण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने काढला होता. त्याला राजकीय विरोधकांसह शिक्षण तज्ञ, बालमानस शास्त्रज्ञ, शिक्षक, पालक, विचारवंत अशा सर्व स्तरावरून प्रखर विरोध झाल्यानंतर सरकारने पाऊल मागे घेतले आणि आदेश मागे घेतला. त्यानंतर हिंदी विरोधात आघाडीवर असलेल्या ठाकरे बंधूंनी तब्बल 19 वर्षांनी एका मंचावर येत विजय सभाही आयोजित केली. आता राज ठाकरे मीरा रोड येथे आभार सभाही घेणार आहेत.
मराठी व हिंदी भाषिकांमध्ये वादाची bhiti
या पार्श्वभूमीवर स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी ठाकरे बंधू यांच्या मराठी प्रेमाबद्दल आणि मराठी मुळाबद्दल घेतलेले आक्षेप नव्या वादाचे कारण ठरण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते राज आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे आणला असला तरी देखील त्यामध्ये राजकीय स्वार्थ हा उद्देश आहे. त्यामुळे मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये उभा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, असेही स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी नमूद केले.
''मला मराठी शिकवा, मी देशभर मराठी शिकवेन''
महाराष्ट्रातील सर्व संतांचे ज्ञान मराठी भाषेत आहे. ते ज्ञान मला आत्मसात करायचे आहे. मी दोन महिने मुंबईत आहे. मला मराठी शिकवण्याची व्यवस्था करा. मी देशभर मराठी शिकवेन, असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद राज आणि उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हणाले आहेत. दोन महिन्यानंतर मुंबईतून जाताना मी त्यांच्याशी मराठीत संभाषण करून जाईन, असेही ते म्हणाले.