- राज्य
- जैन मंदिर पाडण्याची कारवाई योग्य असल्याचा उच्च न्यायालयाचा निर्वाळा
जैन मंदिर पाडण्याची कारवाई योग्य असल्याचा उच्च न्यायालयाचा निर्वाळा
मंगल प्रभात लोढा यांची हाकालपट्टी करण्याची महापालिका अभियंत्यांकडून मागणी
मुंबई: प्रतिनिधी
विलेपार्ले येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडण्याची मुंबई महापालिकेची कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशन ही संघटना आक्रमक झाली आहे. अहिंसा प्रिय समाजाला भडकवण्याचा आरोप करून त्यांनी त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
महापालिकेच्या के पूर्व विभागाने एप्रिल महिन्यात कारवाई करून कांबळी वाडी येथील पार्श्वनाथ जैन मंदिर पाडले होते. यामुळे जैन समाजाने मोठे आंदोलन करण्याबरोबरच न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने कारवाईला स्थगिती देऊन जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर कथित मंदिराची जागा मोकळी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मंगल प्रभात लोढा हे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांनी मोर्चाचे नेतृत्व करणे अथवा एखाद्या समाजाला भडकवणे अपेक्षित नाही. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद काढून घेण्यात यावे आणि आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे तसेच या सदर्भात न्यायालयाकडे ही दाद मागणार असल्याचे इंजिनीअर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश भुतेकर देशमुख यांनी सांगितले आहे.
या कथित मंदिराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन आले आहे. या ठिकाणी मंदिर नव्हते तर पत्रा शेड होती, प्रत्यक्ष तोड काम करताना कोणीही आक्षेप घेतला नाही. उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यावर सर्वजण पुढे आले, असा दावा भुतेकर देशमुख यांनी केला आहे. याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले सहआयुक्त नवनाथ घाडगे यांना पुन्हा सन्मानाने बोलावण्यात यावे, अशी मागणी ही त्यांनी केली आहे.