- राज्य
- 'मोदी यांना पर्याय कोण, हा प्रश्न लोकशाहीत अनाठायी'
'मोदी यांना पर्याय कोण, हा प्रश्न लोकशाहीत अनाठायी'
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांची स्पष्टोक्ती
तिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था
भारतात अध्यक्षीय नव्हे तर प्रतिनिधिक लोकशाही असल्यामुळे पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पर्याय कोण, हा प्रश्न असंयुक्तिक आहे. मतदार एखाद्या व्यक्तीसाठी नव्हे तर पक्षाच्या विचारसरणीसाठी, संविधान आणि देशातील विविधतेचे रक्षण करण्यासाठी योग्य वाटणाऱ्या पक्षाला मतदान करतो, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी नमूद केले.
एका पत्रकाराने आपल्याला, मोदी यांना पर्याय कोण, असा प्रश्न विचारला. हा प्रश्नच भारतीय लोकशाहीत अनाठायी आहे. देशाचे संविधान आणि विविधतेचे रक्षण कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा महत्वाचे आहे, असे सांगत थरूर यांनी जणू भारतीय जनता पक्षाच्या प्रचार मोहिमेवरच शरसंधान केले आहे.
लोकसभा निवडणूक प्रचारात भाजपने मागील दहा वर्षात झालेल्या विकासाचे दाखले देतानाच विकासाची प्रक्रिया कायम ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसविण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. या व्यक्तिकेंद्रित प्रचाराला थरूर यांनी लक्ष्य केले आहे.
राजकीय पक्ष हे निष्ठेने विचारसरणीचे अनुसरण करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या हितरक्षणाबाबत जागरूक असणाऱ्या व्यक्तींचा समूह असतो. त्यामुळे लोकांच्या अडीअडचणी दूर करून त्यांचा विकास करणाऱ्या, जबाबदार, अनुभवी आणि अहंकाराचा लवलेश नसलेल्या भारतीय नेत्यांचा समूह हाच नरेंद्र मोदी यांच्यासाठी पर्याय ठरू शकतो, असेही थरूर यांनी नमूद केले.