- राज्य
- 'मराठीबद्दल शब्दही न काढता सत्ता गेल्याचे रडगाणे"
'मराठीबद्दल शब्दही न काढता सत्ता गेल्याचे रडगाणे"
देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका
मुंबई: प्रतिनिधी
मराठी विजय मेळाव्यात मराठीबद्दल एकही शब्द न काढता सत्ता गेल्याचे रडगाणे गाण्यात आले, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली. ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचे श्रेय राज ठाकरे यांनी दिल्याबद्दल फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
वरळी दोन येथे झालेला कार्यक्रम मराठी विजय मेळावा असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, त्या ठिकाणी मराठीबद्दल अवाक्षरह न काढता, आपली सत्ता गेल्याची 'रुदाली' अर्थात शोक गीत गाण्यात आले, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. राज ठाकरे यांच्या बाबत मात्र त्यांनी कोणतेही विधान केले नाही.
तब्बल 25 वर्ष मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेनेकडे होती. मात्र, त्यांच्या कार्यकाळात कोणताही विकास झाला नाही. उलट मराठी माणूस मुंबई बाहेर गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबईचा चेहरा मोहरा बदलून दाखवला. बीडीडी चाळ, पत्राचाळ अशा अनेक ठिकाणी आम्ही नागरिकांना चांगली मोठी घरे उपलब्ध करून दिली. त्यामुळे मुंबईतील मराठी आणि अमराठी माणूसही आज ठामपणे आमच्या पाठीशी आहे, असा जावाही फडणवीस यांनी केला.
आम्ही मराठी आहोत. मराठी असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्याचप्रमाणे आम्ही हिंदू आहोत याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे, असे मत देखील फडणवीस यांनी व्यक्त केले.