- राज्य
- न्या. भूषण गवई सरन्यायाधीश होणे म्हणजे सामाजिक समतेचा विजय
न्या. भूषण गवई सरन्यायाधीश होणे म्हणजे सामाजिक समतेचा विजय
विधिमंडळातील सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
मुंबई: प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी भूषण गवई यांची नियुक्ती होणे म्हणजे भारतीय लोकशाहीतील सामाजिक समतेचा आणि सर्वसमावेशकतेचा विजय आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आज राज्य विधिमंडळातर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात सत्कार करण्यात आला त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की, महाराष्ट्रातली एक व्यक्ती देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसते याचा आनंद सगळ्यात जास्त आहे आणि भूषण गवई हे महाराष्ट्राचे सुपुत्र नाहीत तर, महाराष्ट्राचे भूषण देशाच्या न्यायप्रणालीचे शिरोमणी ठरलेले आहेत.
महाराष्ट्राला कर्तव्यकठोर न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांची परंपरा आहे आणि हा वारसा भूषण गवई यांच्या सरन्यायाधीशपदी निवडीमुळे पुढे जाईल असा विश्वास मला वाटतो असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या अनेक निर्णयांमधून मानवता, संवेदनशीलता आणि संविधानिक मूल्यांची प्रतिष्ठा उंचावण्याचं काम केले. सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांना त्यांनी न्याय मिळवून दिला. त्यांना हक्क मिळवून दिला. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी माणुसकीचा तत्व कायम जपलं. केवळ न्यायमूर्ती म्हणून नव्हे तर, एक आदर्श नागरिक, कठोर परिश्रमी विद्यार्थी, आणि एक संवेदनशील माणूस म्हणूनही त्यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
ज्याला संविधानाचा आत्मा कळला त्याला कायद्याची पुस्तकं बाराखडी सारखी सोपी होतात आणि ते उदाहरण म्हणजे भूषण गवई आहेत. न्यायदान करताना त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय दिले असून त्यांची भाषा सौम्य असली तरी निर्णय मात्र ठाम असतात आणि म्हणून त्यांचे कर्तृत्व दीपस्तंभासारखे आहे असेही ते म्हणाले.
अमरावती येथील एका साध्या कुटुंबातून येऊन त्यांनी सरन्यायाधीश पदापर्यंत प्रवास करून त्यांनी यश मिळवलं हे भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.