- राज्य
- न्यायालयाने मान्य करूनही मुस्लिमांना आरक्षण का नाही?
न्यायालयाने मान्य करूनही मुस्लिमांना आरक्षण का नाही?
शिक्षण क्षेत्रात पाच टक्के आरक्षण देण्याची मागणी
मुंबई: प्रतिनिधी
मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण आणि नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याची आवश्यकता असून त्यासाठी समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
शिक्षण क्षेत्रात मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यास न्यायालयाने मान्यता दिली असताना देखील स्वातंत्र्योत्तर काळात कोणत्याही सरकारकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या मागासलेपणात भर पडत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अनेक समित्या आणि आयोगांनी देखील मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरी यामध्ये आरक्षण देण्याच्या शिफारशी केल्या आहेत, हे देखील सारंग यांनी निदर्शनास आणून दिले.
मराठा आरक्षणाच्या बाबतीत तातडीने आणि जिद्दीने सरकारकडून मार्ग काढण्यात आल्याबद्दल सारंग यांनी सरकारचे अभिनंदन केले. अशाच पद्धतीने मुस्लिम समाजासाठी लवकरात लवकर आरक्षण लागू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वास्तविक, रस्त्यावर उतरून आंदोलने करणे, मोर्चे काढणे आमच्या तत्वात बसत नाही. त्यामुळे आम्ही शांततापूर्ण मार्गाने आरक्षणाची मागणी करत आहोत. मात्र, वेळ पडल्यास समाजाच्या प्रगतीसाठी न्याय, मिळावा म्हणून नाईलाजाने या पर्यायाचा देखील विचार केला जाऊ शकतो, असा इशाराही सारंग यांनी दिला आहे.