- राज्य
- 'हिम्मत असेल तर जरांगे यांनी स्वतः समोर यावे'
'हिम्मत असेल तर जरांगे यांनी स्वतः समोर यावे'
नवनाथ वाघमारे यांचे मनोज जरांगे पाटील यांना खुले आव्हान
जालना: प्रतिनिधी
दुसऱ्यांना पुढे करून जाळपोळ करण्यापेक्षा हिम्मत असेल तर जरांगे पाटील यांनी स्वतः आमच्यासमोर यावे, असे आव्हान ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज रंगे पाटील यांना दिले आहे.
काल रात्री उशिरा एका अज्ञात इसमाने नवनाथ वाघमारे यांची गाडी ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हा प्रकार जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून झाल्याचा वाघमारे यांचा आरोप आहे.
इतरांना हल्ले, जाळपोळ करायला लावायचे आणि स्वतः अंतरवली सराटीच्या बिळात जाऊन लपायचे, असे जरांगे पाटील यांचे उद्योग आहेत. त्यांनी यापूर्वी देखील मराठ्यांच्या अनेक पोरांना फसवले आहे, असा आरोप वाघमारे यांनी केला.
आम्ही खरे बोलतो म्हणून जरांगे यांना राग येतो. मी शरद पवार, रोहित पवार, राजेश टोपे यांच्या विरोधात बोललो की जरांगे यांचा तीळपापड होतो. जरांगे यांचा माज असाच कायम राहिला तर आम्ही त्यांच्या गाड्या अडवू. माझे कार्यकर्ते जरांगे यांच्या घरासमोर उभे ठाकण्यासही कचरणार नाहीत, असा इशाराही नवनाथ वाघमारे यांनी दिला.