- राज्य
- सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आवळल्या गुन्हेगारांच्या मुसक्या
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आवळल्या गुन्हेगारांच्या मुसक्या
तब्बल ४३ सराईत गुंडांना केले जेरबंद
पुणे: प्रतिनिधी
सणासुदीच्या हंगामात शहरातील कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली असून गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तब्बल ४३ गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून जेरबंद केले असल्याची माहिती विभाग १ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी दिली आहे.
मागील काही काळापासून शहरातील कायदा सुव्यवस्था स्थितीबाबत सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. टोळीयुद्ध, खून, महिलांवरील अत्याचार यापासून ते साखळी चोरी, पाकिटमारी अशा रस्त्यावरील गुन्ह्यांच्या प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी आणि सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, हा पुणे पोलिसांचा प्रयत्न आहे.
कोथरूड येथे क्षुल्लक कारणावरून सामान्य नागरिकांवर गोळीबार आणि कोयता हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांची पोलिसांनी गोळीबाराच्या ठिकाणापासूनच धिंड काढली. हा त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून 43 सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.