- राज्य
- 'बदनामीच्या खटल्यात राहुल गांधी यांची उपस्थिती अनावश्यक'
'बदनामीच्या खटल्यात राहुल गांधी यांची उपस्थिती अनावश्यक'
पुणे न्यायालयात ॲड मिलिंद पवार यांचा युक्तिवाद
पुणे: प्रतिनिधी
राहुल गांधी यांच्यावर बदनामीकारक वक्तव्याबद्दल दाखल केलेल्या खटल्यात त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा आदेश द्यावा, असा याचिकाकर्ते सप्तकी सावरकर यांचाअर्ज निराधार आणि बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी न्यायालयात केला. अशा अर्जांना कचऱ्याची टोपली दाखवावी, अशी विनंती देखील त्यांनी केली.
राहुल गांधी यांनी प्रत्यक्ष उपस्थित रहावे यासाठी याचिकाकर्त्यांनी केलेला अर्ज कोणत्या कायद्याच्या आधारावर केला आहे, याचे स्पष्टीकरण त्यांच्याकडून घेण्यात यावे. त्यानंतरच या अर्जावर गांधी यांच्या वतीने सविस्तर उत्तर देता येईल, असेही त्यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले.
सावरकर यांच्या वतीने न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अर्ज एकतर्फी, निराधार असून त्याला कोणत्याही कायद्याचे पाठबळ नाही, असा दावा ॲड पवार यांनी केला. खटल्याच्या कामकाजात राहुल गांधी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे कोणतेही ठोस कारण अथवा कायदेशीर तरतूद या अर्जात नोंदविण्यात आलेले नाही, याकडे ॲड पवार यांनी लक्ष वेधले.
राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला हा खटला म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या कुटील कारस्थानाचा एक भाग आहे. गांधी यांना राजकीय दृष्ट्या त्रस्त करणे आणि खटल्याच्या कामकाजात गुंतवून त्यांचा कालापव्यय करण्याच्या उद्देशाने असे खटले देशभरातील विविध न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत, असेही ॲड पवार यांनी सांगितले.
या अर्जात करण्यात आलेला महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे आणि गोपाळ गोडसे यांचा उल्लेख त्यांची भलामण करणारा आहे. गांधी हत्येनंतर गोडसे यांच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालण्यात आला नाही, हा अर्जात करण्यात आलेला दावा गांधी हत्येच्या प्रकरणाचे गांभीर्य कमी करणारा आणि सामान्यीकरण करणारा असल्याचा आक्षेपही ॲड पवार यांनी घेतला.
या खटल्याची पुढील सुनावणी तीन ऑक्टोबर रोजी होणार आहे.