- राज्य
- आंदेकर टोळीने वसूल केली तब्बल वीस कोटींची खंडणी
आंदेकर टोळीने वसूल केली तब्बल वीस कोटींची खंडणी
पोलिसांच्या चौकशीत उघड झाली माहिती
पुणे: प्रतिनिधी
आंदेकर टोळीने गुरुवार पेठेतील मच्छीबाजारातून कोट्यवधीची खंडणी वसूल केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आंदेकर टोळीतील जवळजवळ सर्व सदस्यांना जेरबंद केले असून त्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे.
आयुष कोमकर या मुलाचा खून केल्याचा आरोप आंदेकर टोळीवर आहे. गेल्या वर्षी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून झाला होता. घरगुती मालमत्तेच्या वादातून हा खून झाला असून त्याच्या बहिणीच्या नवऱ्यानेच हा खून घडवून आणण्याचा आरोप आहे. याचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुष्यची हत्या केली, असा गुन्हा पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का अंतर्गत दाखल केला आहे..
मच्छी मार्केट हा आंदेकर टोळीच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत होता. आंदेकर टोळी या बाजारातील व्यापाऱ्यांना धमकावून दरमहा पंधरा ते वीस लाख रुपयांची खंडणी वसूल करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. महापालिका व पोलिसांनी या बाजारातील सर्व अनधिकृत दुकाने बंद केली आहेत. त्याचप्रमाणे महापालिका आणि पोलिसांनी एकत्रित कारवाई करून आंदेकर टोळीची अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे यांच्यावर कारवाई केली आहे.