... म्हणून उद्योगपती अदानींनी पाडले महाविकास आघाडीचे सरकार
अजित पवार यांच्या हवाल्याने संजय राऊत यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई उद्योगपती गौतम अदानी यांच्या घशात जाऊ नये म्हणून आम्ही प्राणपणाने लढलो. त्यामुळेच अदानी यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ होती, असा आरोप करताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाखतीचा हवाला दिला.
सन 2019 मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथ घेऊन स्थापन केलेल्या 80 तासाच्या सरकारबाबत एका मुलाखतीत बोलताना अजित पवार यांनी हे सरकार स्थापन करण्यासाठीच्या बैठकीत नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, गौतम अदानी आणि मी स्वतः उपस्थित होतो, असा खुलासा केला आहे. या मुलाखतीचा हवाला देऊन संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षासह अदानी यांच्यावर आगपाखड केली. अदानी यांच्यासारख्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राची लूट करू नये यासाठीच हा संघर्ष असल्याचेही ते म्हणाले.
... तर आमच्या बागेत सापडले असे पैसे
आमचे कोणत्याही उद्योगपतीशी हितसंबंध नाहीत. म्हणूनच अदानी यांनी आमचे सरकार पाडले. आमचे उद्योगपतींची संबंध असते तर आमच्या बागेत, हेलिकॉप्टर मध्ये आणि विमानात पैसे सापडले असते. मात्र, आम्ही खरोखरच हेलिकॉप्टर मध्ये कोमट पाणी पिऊन राज्यभर दौरे करत आहोत. कारण आम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र अदानींच्या घशात जाऊ द्यायचा नाही, अशी उपरोधिक टिप्पणी करून राऊत यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची बॅग तपासणी आणि त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया यावर टीका केली.
'ती' बैठक कधी झालीच नाही
भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासाठी अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनीच दुजोरा दिला होता. त्यासाठी भाजप नेत्यांबरोबर अनेक बैठकाही झाल्या होत्या, असा दावा अजित पवार यांनी पक्ष कोटीच्या वेळी केला होता. मात्र, प्रत्यक्षात शरद पवार, मोदी आणि शहा यांची बैठक कधी झालीच नाही. तर, मोदी, शहा, फडणवीस, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या बैठका झाल्याचे खुद्द अजित पवार यांनी कबूल केले आहे, असेही राऊत म्हणाले.
Comment List