'उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याशिवाय शिंदे यांना पर्याय नाही...'
संजय राऊत यांनी लगावला टोला
नवी दिल्ली: प्रतिनिधी
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आता उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याशिवाय वेगळा पर्याय उपलब्ध नाही. दिल्लीशी लढण्याची शक्ती शिंदे यांच्याकडे नाही. ती त्यांनी अडीच वर्षांपूर्वीच गमावली आहे, अशा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांना टोला लगावला.
आज नव्या मंत्रिमंडळाच्या होत असलेल्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले आणि भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील शुभेच्छा दिल्या.
राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला आहे. या धक्क्यातून जनता अद्यापही सावरलेली नाही. स्पष्ट बहुमत मिळून देखील मुख्यमंत्री तब्बल तेरा दिवस शपथ घेऊ शकले नाहीत, अशा शब्दात चिमटे काढतानाच, परंपरेनुसार आम्ही देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत आहोत, असे राऊत यांनी नमूद केले.
मागील अडीच वर्षात राज्याच्या संपत्तीची लूट करण्यात आली. या पुढील काळात अशी लूट होऊ नये, ही जबाबदारी तुमच्यावर आहे, असेही राऊत यांनी फडणवीस यांना सुनावले.
उपमुख्यमंत्री पदावर अजितदादांचे आरक्षण
सलग सहा वेळा उपमुख्यमंत्री पद घेणाऱ्या अजित पवार यांचे अभिनंदन करतानाच उपमुख्यमंत्री पद दादांसाठी राखीव असल्याचा चिमटाही राऊत यांनी काढला. अजितदादांचे राजकारण वेगळे आहे. त्यांनी दिल्लीशी व्यवस्थित जुळवून घेतले आहे. दिल्लीने त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. एक उत्तम सहकारी म्हणून उद्धव ठाकरे यांनी देखील अजित दादांचे वेळोवेळी कौतुक केले आहे, असे राऊत म्हणाले.