'एखाद्या समाजावर आधारित पक्षाच्या प्रभावाबाबत साशंकता'
छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती
मुंबई: प्रतिनिधी
कोणत्याही एखाद्या समाजावर आधारित पक्ष राजकारणात कितपत प्रभाव टाकू शकतो, याबाबत साशंकता असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे व इतर मागास प्रवर्गाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सूचित केले. भाजप नेत्या पंकजा मुंडे स्वतंत्र राजकीय पक्ष काढण्याच्या शक्यतेवर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
भारतीय जनता पक्षाचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र केले तर एक स्वतंत्र राजकीय पक्ष उभा राहू शकतो, असे विधान पंकजा मुंडे यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमात केले होते. या विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर रंगू लागली आहे. पंकजा मुंडे या स्वतंत्र पक्षाची बांधणी करण्याची तयारी करीत असल्यापासून ते भाजपला त्यांनी दिलेला गर्भित इशारा आहे, अशा अर्थाची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एखाद्या समाजाने किंवा समाज घटकांनी राजकीय पक्ष स्थापन केल्याची उदाहरणे आपल्याकडे अनेक आहेत. त्यांना राजकारणात कितपत प्रभाव प्रस्थापित करण्यात आला, याची माहिती देखील आपल्यासमोर आहे. केवळ एखाद्या समाजावर आधारलेला पक्ष कितपत यश मिळवू शकतो, याची आपल्याला कल्पना नाही, असे भुजबळ म्हणाले.
गोपीनाथ मुंडे यांनी देखील सोडला स्वतंत्र पक्षाचा नाद
पंकजा मुंडे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला. गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते आणि मी उपमुख्यमंत्री असताना ते माझ्याकडे आले. तुम्ही, मी, गणपतराव देशमुख, रामदास आठवले असे सर्वजण एकत्र येऊन स्वतंत्र राजकीय पक्ष काढू, असा प्रस्ताव त्यांनी दिला. मी त्यांना मला उपमुख्यमंत्री पदाचा आणि त्यांना विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा लागेल, याची जाणीव करून दिली. ते म्हणाले की, यामुळे सर्व छोटे पक्ष एकत्र येऊन एक प्रभावी पक्ष उभारणार असेल तर माझी तयारी आहे. मात्र, पुढे त्यांनी हा विचार सोडून दिला, ही आठवण भुजबळ यांनी सांगितली.
पंकजा मुंडे स्वतंत्र पक्ष काढण्याच्या विचारात असतील असे आपल्याला वाटत नाही. त्यांनी देखील सर्व अभ्यास केलाच असेल. केवळ गोपीनाथ मुंडे यांची लोकप्रियता एक स्वतंत्र पक्ष उभा करण्या एवढी होती, हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असावा, असे मला वाटते, असेही भुजबळ म्हणाले.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये नाराज असताना भुजबळ यांना स्वतंत्र पक्ष काढण्याचा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता. भुजबळ यांनी स्वतंत्र पक्ष उभारल्यास आपण त्यांच्याबरोबर युती करू, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली होती. भुजबळ यांनी आयोजित केलेल्या समता परिषदेच्या भव्य मेळाव्यानंतर हे पक्ष स्थापन करणार असल्याचे चर्चांना वेग आला होता. मात्र, अद्याप तसे काही घडलेले नाही.
Comment List