दिवाकर शेजवळ
divakarshejwal1@gmail.com
कुपरेज हे मुंबई विद्यापीठ आणि मंत्रालय यांच्या दरम्यान म्हणजे शिक्षण केंद्र आणि सत्ताकेंद्र यांचा सुवर्णमध्य साधणारे स्थान. तिथला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा शहरातील पाहिला. शिल्पकार राम सुतार यांनी तयार केलेला. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे, साक्षात ' सूर्यपुत्र ' भय्यासाहेब आंबेडकर यांच्या मान्यतेची आणि पसंतीची मोहोर त्याला लाभली आहे. त्यामुळे त्या पुतळ्यात बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची अचूकता पुरेपूर साधली आहे. त्या पुतळ्याचे अनावरणही भय्यासाहेब यांच्याच आग्रहावरून १९६२ सालात प्रजासत्ताक दिनी राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले होते.
आता दादरला चैत्यभूमी नजीकच्या इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे राहात आहे. तेथील पुतळ्याचे कामही राम सुतार यांच्याकडेच सोपवले गेले आहे. शिल्पकलेतील त्यांचे कौशल्य, कामगिरी आणि ख्याती वादातीत आहे. पण कुपरेज येथील बाबासाहेबांचा पुतळा साकारताना ऐन उमेदीत म्हणजे वयाच्या पस्तिशित असलेले राम सुतार हे आजघडीला ९९ वर्षांचे आहेत. पुढच्या वर्षी ते 'शतक वीर ' ठरतील!
या वयात इंदू मिल येथील बाबासाहेबांच्या नियोजित पुतळ्यात त्यांचे स्वत:चे कसब, कौशल्य उतरण्याची अपेक्षाच मुळात अनाठायी आहे. त्यामुळे अख्ख्या जगासाठी लक्षवेधी ठरणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्मारकातील पुतळ्याचे काम हे फक्त आणि फक्त राम सुतार यांचा लौकिक पाहून त्यांच्या 'कंपनी ' ला दिले गेले आहे, हे स्पष्टच आहे. परिणामी: तो पुतळा शिल्पकार असलेले त्यांचे पुत्र अनिल सुतार हेच साकारत आहेत. अन् स्वाभाविकपणे डॉ. बाबासाहेबांचे मूर्तिमंत , हुबेहूब व्यक्तिमत्त्व पुतळ्यात उतरविण्यात त्यांचे कसब तोकडे पडले आहे. संकल्पित उत्तुंग पुतळ्याच्या अनिल सुतार यांनी तयार केलेल्या २५ फूट उंचीच्या नमुना प्रतिकृतीमध्ये अनेक दोष, वैगुण्ये ठसठशीतपणे नजरेत भरत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चेहरा, त्यावर दाटलेली खिन्नता, त्यांची केशरचना,
चुरगळलेला पेहराव अशा अनेक गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर अन्याय करणाऱ्या आहेत. त्यातून त्या शिल्पकाराच्या मर्यादा उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचा सदोष पुतळा कदापिही स्वीकारला जाणार नाही, हे उघड आहे.
इंदू मिल येथील स्मारकाच्या उभारणीतील धिमी गती आणि त्याला होत आलेला विलंब हा काही नवा नाही. त्यामुळे निम्मे काम बाकी असलेल्या त्या स्मारकातील बाबासाहेबांचा पुतळा धिसाडघाईत दोष, वैगुण्यासह स्वीकारला जाईल, या भ्रमात कुणीही न राहिलेले बरे !
वादग्रस्त पुतळ्यासोबतच इंदू मिल येथील जागेचे एकूण क्षेत्रफळ ( साडेबारा एकर ), तेथील उपलब्ध जागेचा स्मारकासाठी पुरेपूर लाभ उठवण्यात हात आखडता घेणारा आराखडा, त्याची उभारणी, रचना, त्यातील नियोजित उपक्रमांसाठी अपेक्षित आणि निर्धारित क्षेत्रफळ यातील तफावत असे अनेक मुद्दे महत्त्वाचे आहेत. मात्र ते दुर्लक्षित करून बाजूला सारले जात असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.
000
About The Author
