- राज्य
- महापालिका निवडणुकीत मुंबईकर घडवणार परिवर्तन
महापालिका निवडणुकीत मुंबईकर घडवणार परिवर्तन
महायुतीचाच महापौर होणार असल्याचा एकनाथ शिंदे यांचा दावा
मुंबई: प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीत मुंबईकर जनता निश्चितपणे परिवर्तन घडवून आणेल आणि मुंबईचा पुढचा महापौर महायुतीचाच असेल, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
शहरातील काही माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी शिंदे बोलत होते.
केवळ विकास हाच आपला अजेंडा आहे. अनेक नगरसेवकांच्या प्रभागात काही कामे अडकून पडली आहेत. महायुती सरकार सत्तेवर आल्यावर या कामांची पूर्तता करण्यास सुरुवात झाली आहे. आपला दवाखाना, काँक्रीटचे रस्ते व महापालिकेचे संबंधित इतर कामांना आता गती प्राप्त झाली आहे, असा दावा शिंदे यांनी केला.
मुंबईतील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प दीर्घ काळापासून रखडलेले आहेत. त्यामुळे हजारो मुंबईकर मुंबई सोडून मुंबईच्या बाहेर गेलेले आहेत. महायुती सरकार या प्रकल्पांच्या कामांना गती देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करेल आणि मुंबईच्या बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा शहरात जागा दिली जाईल, असे शिंदे म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आमच्या कामाची पावती दिली. महापालिका निवडणुकीत देखील मुंबईकर मतदार काम करणाऱ्यांना मत देतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. दीर्घकाळ मुंबईवर राज्य करणाऱ्यांनी मुंबईकडे केवळ सोन्याचे अंडे देणारी कोंबडी याच दृष्टीने पाहिले. कोरोना महामारीच्या काळात मृतदेहाच्या बॅगांमध्ये देखील त्यांनी भ्रष्टाचार केला. आता मात्र मुंबईकर भ्रष्टाचारांना मते देणार नाहीत तर काम करणाऱ्यांना मते मिळतील, असेही ते म्हणाले.
मुंबईतील तब्बल 62 माजी नगरसेवक महायुतीतील घटक पक्षांकडे आले आहेत. ही संख्या यापुढेही वाढणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा ोडणार्यांना मतदारांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक निवडणुकीत आपली जागा दाखवली आहे. राज्य सरकारने केलेल्या कामाच्या जोरावर महापालिका निवडणूक देखील महायुती जिंकेल, असेही शिंदे यांनी सांगितले.