'भारतातील जनता नाही तर नेतेच जातीयवादी'
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची स्पष्टोक्ती
अमरावती: प्रतिनिधी
भारतातील जनता मुळात जातीयवादी नाही तर राजकीय नेतेच जातीयवादी आहेत. आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी त्यांच्याकडून जातीचा वापर केला जात आहे, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. वास्तविक जनतेची आणि देशाची प्रगती हे राजकारणाचे उद्दिष्ट असले पाहिजे. जातीवर आधारित वोट बँक तयार करणे हे नाही, असेही त्यांनी सुनावले.
डॉ पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार वितरण समारंभात गडकरी बोलत होते. यावेळी जाती-धर्माच्या आधारावर राजकारण करणाऱ्या नेत्यांवर त्यांनी तोफ डागली.
सध्याच्या काळात सामाजिक न्यायासाठी मागासलेपणावर चर्चा करण्यापेक्षा ती राजकीय सौदेबाजी करण्यासाठी अधिक केली जात असल्याची टीका गडकरी यांनी केली. समाजात, राजकारणात स्वतःची संस्थाने स्थापन केलेली नेते मंडळी आपणच सर्वाधिक मागास असल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे समाजात नकारात्मक भावना वाढत चालली आहे, असेही गडकरी यांनी निदर्शनास आणून दिले.
राजकारणाची परिभाषा बदलणे गरजेचे
राजकारण हे केवळ निवडणुका जिंकण्यापुरते मर्यादित नसावे तर जनतेची सेवा आणि विकास हे राजकारणाचे केंद्र असावे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच गडकरी यांनी निवडणूक लढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या खर्चाबद्दल चिंता व्यक्त केली. पैशाच्या जोरावर लढवल्या जाणाऱ्या निवडणुकांकडे पाहता राजकारणाची परिभाषा बदलणे आवश्यक असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले.
कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल आवश्यक
एकेकाळी कृषी प्रधान देश असलेल्या भारतात कृषी क्षेत्राची अवस्था बिकट झाली असून या क्षेत्रात आमूलाग्र बदल आवश्यक आहेत, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. भारतातील शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमता अत्यंत कमी आहे. उदा. स्पेनमध्येटन एक एकरात 25 ते 30 टन संत्र्याचे उत्पादन होते. हेच प्रमाण भारतात केवळ चार ते पाच टन एवढे मर्यादित आहे. अर्थात, हा दोष भारतीय शेतकऱ्यांचा नाही तर भारतात शेतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव हे त्याचे कारण आहे. शेतकऱ्यांना या सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे, असेही गडकरी म्हणाले.