- राज्य
- 'अमराठी बिल्डरांना विकून टाकली मुंबई'
'अमराठी बिल्डरांना विकून टाकली मुंबई'
बेस्टच्या जमिनींवर डोळा असल्याचा संजय राऊत यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण मुंबई अमराठी बांधकाम व्यावसायिकांना विकली असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. बेस्टच्या जागांवर सरकारचा डोळा असून त्यादेखील आपल्या मर्जीतील बिल्डरांच्या घशात घालण्याचा त्यांचा डाव असल्याचेही राऊत म्हणाले.
बेस्ट कामगारांच्या पतसंस्था निवडणुकीत पुढाकार घेणारे प्रसाद लाड हे देखील स्वतः बांधकाम व्यावसायिक आहेत. बेस्टची बस वाहतूक तोट्यात आणून ती बंद पाडायची आणि डेपोच्या जागा घेऊन करायच्या, याचा कट फडणवीस, लाड यांनी आखला आहे. त्यासाठीच त्यांनी बेस्ट पतसंस्था ताब्यात घेतली, असा आरोपही राऊत यांनी केला.
पतसंस्थेच्या निवडणुकीत लाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्येक मतासाठी तब्बल पाच हजार रुपये मोजले. या निवडणुकीतील 1 हजार 800 मते बाद ठरली. ही मते कोणाच्या पारड्यात होती याची तपासणी केली असता ती शिवसेनेला मिळाल्याचे दिसून येईल, असा दावा देखील राऊत यांनी केला. या निवडणुकीत 1000 मते अपक्षांनी खाल्ली. हे अपक्ष भाजपनेच उभे केले होते, असेही ते म्हणाले.
शिंदे, फडणवीस ब्रँड नाही तर ब्रँडीच्या बाटल्या
राज्यात ठाकरे हा एकमेव ब्रँड आहे. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ब्रँड नाही तर ब्रँडीच्या बाटल्या आहेत. ती पिऊन नशाही होत नाही, अशी टीका राऊत यांनी केली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिराती सर्व दैनिके व प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर शिंदे यांनी देखील प्रमुख दैनिकातून जाहिराती प्रसिद्ध केल्या. वास्तविक न्यायालयाने शिंदे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देणे गरजेचे आहे. मात्र, न्यायालय देखील त्यांचीच आहेत, असा आरोपही राऊत यांनी केला.