- राज्य
- 'देवाभाऊंच्या जाहिराती देणारा अदृश्य दाता कोण?'
'देवाभाऊंच्या जाहिराती देणारा अदृश्य दाता कोण?'
जाहिरातीची वेळ, खर्च, हेतू आणि उद्देश संशयास्पद असल्याचा राऊत यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करत असल्याची जाहिरात करण्यात एका दिवसात ४० ते ५० कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. हा खर्च करणारा अदृश्य दाता नेमका कोण, हे महाराष्ट्रासमोर आले पाहिजे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. या जाहिरातीची वेळ, खर्च, हेतू आणि उद्देश संशयास्पद असल्याचा आरोपही त्यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण विश्वाला वंदनीय आहेत. प्रत्येक मराठी माणसाने त्यांना वंदन करणे हे आपले कर्तव्य आहे. मात्र, त्यांच्या प्रतिमेचा वापर राजकीय लाभासाठी आणि प्रतिमासंवर्धनासाठी केला जात असेल तर ते चालू देणार नाही, असे राऊत यांनी बजावले. ही जाहिरात कोणी दिली त्या व्यक्ती किंवा संस्थेचे नाव जाहीर करण्यात आले नाही. या जाहिरातीसाठी करण्यात आलेला मोठा खर्च काळ्या पैशातून, कंत्राटदार किंवा गुन्हेगारांच्या पैशातून करण्यात आला असावा, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.
छत्रपतींनी या राज्यातील अठरापगड मराठी मावळ्यांना स्वराज्य मिळवून दिले. त्यांना सर्व जातीधर्माच्या मावळ्यांनी साथ दिली. भारतीय जनता पक्ष मात्र, त्यांच्या नावाने एकजातीय राजकारण करत आहे. त्यांना शिवाजी महाराज यांच्याबद्दल एवढे प्रेम असेल तर भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात छत्रपतींचे छायाचित्र लावावे आणि त्यांचा पुतळा उभा करावा, असेही राऊत म्हणाले.
मुंबईच्या समुद्रात छत्रपती शिवरायांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे जलपूजन समुद्रात जाऊन केले. मात्र, त्या स्मारकाच्या उभारणीचे काय झाले? ते स्मारक कधी साकारले जाणार, याची आम्ही अजूनही प्रतीक्षा करत आहोत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याच्या वृत्ताबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात उत्तम प्रकारे संवाद सुरू असून भविष्यात राजकीय दृष्ट्या एकत्र येण्यास आमची सहमती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.