- राज्य
- ठाण्यातील निरीक्षणगृहातून मुली बेपत्ता
ठाण्यातील निरीक्षणगृहातून मुली बेपत्ता
डॉ. नीलम गोऱ्हे यांची कठोर कारवाई करण्याची मागणी
गंभीर समस्येत लक्ष घालून मुळापासून सोडविण्याची व्यक्त केली आवश्यकता
ठाणे: प्रतिनिधी
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शासकीय मुलींचे निरीक्षणगृह/विशेषगृह, उल्हासनगर–५ येथून सहा मुली बेपत्ता झाल्याच्या गंभीर घटनेमध्ये तातडीने कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना निवेदन पाठवून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले आहे की, दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी घडलेल्या या घटनेत तीन मुलींचा शोध लागला असला तरी उर्वरित तीन मुली बेपत्ता आहेत. यापूर्वीदेखील अशा घटना घडल्यामुळे राज्यातील बालगृहांमध्ये मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
तत्काळ उपाययोजनांमध्ये डॉ. गोऱ्हे यांनी सतर्क महिला पोलिसांची गस्त वाढविणे, परिसरातील दलाल व फूस लावणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करणे, तसेच जिल्हा प्रशासन आणि संबंधित संस्थेच्या प्रमुखांसह समन्वय साधून शासन स्तरावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनाची प्रत महिला व बालविकास मंत्री, गृह विभागाचे सचिव, महिला व बालविकास विभागाचे सचिव आणि आयुक्त यांना पाठविण्यात आली असून, डॉ. गोऱ्हे यांनी या गंभीर समस्येवर वैयक्तिक लक्ष घालून ती मुळापासून सोडविण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे.