संयमाचे मोल मोठे...

संयमाचे मोल मोठे...

दखल बेदखल / रमेश कुलकर्णी

राजकारण खूप विचित्र असते. राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नसतो. आजचा मित्र उद्याचा शत्रू किंवा याउलट आजचा शत्रू उद्याचा मित्र असू शकतो. राजकारणाची आणखी एक बाजू म्हणजे इथे काहीच कायमचे नसते. येथे शत्रू वा मित्र वेळेनुसार ठरतात. समोर झालेले कौतुक आपल्या माघारी टिकेलच याची शाश्वती नाही. राजकारणात 'स्वस्त' असे काहीच मिळत नाही. प्रत्येकाला त्याची त्या वेळेनुसारची 'किंमत' चुकवावी लागते. 'शह-काटशह' हे तर राजकारण्यांच्या आयुष्याचा दैनंदिन भाग बनला असतो. शारीरिक व्यंग, देहबोली तथा आप्तस्वकीयांवरून केलेली जहरी टीका आता नित्याचीच बाब झाली आहे. काही झाले तरी 'मतभेद' आणि 'मनभेद' या गोंडस शब्दांमागे लपण्याची सोय केलेली असतेच. राजकारण्यांना आपली 'मती' शाबूत ठेवून 'मनी'चा योग्य पद्धतीने वापर करण्याची कला अवगत असणे अत्यावश्यक आहे. म्हणजे 'भेदाला' फारसे स्थान उरत नाही. कुठल्याही राजकीय व्यक्तिमत्त्वाची ही एक बाजू असली, तरी राजकारणात सहनशीलता राखून मेहनत करण्याशिवाय पर्याय नाही.

कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी संघर्ष अटळ असतो. त्यात राजकीय क्षेत्र वेगळे काढून कसे चालेल? तिथला संघर्ष व्यक्तिगत उरत नाही. त्याला सार्वजनिक किनार लाभते. कार्यकर्ता ते नेता हा प्रवास खडतरच असतो. कार्यकर्ता असताना कुठल्याही चुकीला सहजपणे माफ करण्याची सोय आहे. नेत्यांच्या पंक्तीत जाऊन बसल्यानंतर योग्य की अयोग्य याची तपासणी वारंवार करावी लागते. तरीही नेता बनण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. अर्थातच, नेता बनण्याच्या 'प्रोसेस'मधील फायद्या-तोट्यांचा विचार केला तर फायदेच अधिक असावेत. म्हणून ही स्पर्धा अधिक तीव्रतेची होत असावी.

लोकनेता होण्याची प्रक्रिया तर अजूनच बिकट आहे. त्या प्रक्रियेत प्रत्येकाला यश मिळेलच याची खात्री नसते. संधी मिळाली तरी लोकांच्या मनात स्थान मिळेल याची शाश्वती नसते. उदाहरणच द्यायचे तर अलीकडेच यशस्वीरीत्या पायउतार झालेल्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे देता येईल. सर्व कसोट्या उत्तीर्ण करीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्षपदाची कारकीर्द गाजविली. निरोपाला सामोरे जाताना त्यांच्या डोळ्यात कृतार्थ भाव जाणवले. संयम व निष्ठा यांचा अनुकरणीय परिपाठ त्यांनी स्वकर्तृत्वाने घालून दिला. विजयाची हॅट्ट्रिक करणारा हा नेता २०१४च्या युती सरकारमध्ये ऊर्जामय खात्याचा कॅबिनेट मंत्री झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असल्याने उपराजधानीचे पालकत्व त्यांना बहाल केले गेले. अव्याहत कार्यशैलीमुळे त्यांनी जाहीर कार्यक्रमात देवाभाऊंची शाबासकी पटकाविली. २०१९ च्या लोकसभेत विदर्भातून पक्षाला घसघशीत यश मिळवून देण्यातही त्यांनी मोठा वाटा उचलला; परंतु विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत या कारकिर्दीला कुणाची तरी दृष्ट लागली. नंतरच्या नाट्यमय घडामोडीत हातात असलेली आमदारकी गमाविण्याची वेळ त्यांच्यावर आली. महाराष्ट्रातील पाच दिग्गजांच्या तिकीट कपातीत बावनकुळेंचाही नंबर लागला. पक्ष आणि नेत्यांसाठीही ही घटना जेवढी आश्चर्यजनक तेवढीच अनाकलनीय होती. संघर्षाने उभ्या केलेल्या प्रतिमेचे भंजन होण्याचे दुःख राजकीय नेत्यांना अधिक असते. जवळपास सगळेच संपले अशी ती स्थिती होती. हाताबाहेर गेलेल्या स्थितीवर मात करून संयमाने वाटचाल करणाऱ्यालाच धैर्यवान राजकारणी समजले जाते. राजकीय जीवनात चढउतार येत राहतात. यश-अपयशाची हुलकावणीही क्रमप्राप्त असते. त्याला ओळखण्याची क्षमता असणाराच यशस्वी लोकनेता होऊ शकतो हे बावनकुळेंनी सोदाहरण सिद्ध केले. स्वतःच्या तिकीट कपातीच्या 'एपिसोड' नंतर डोळ्यातील अश्रू पुसून बावनकुळे काही तासातच कामाला लागले होते.

हे पण वाचा  न धरावा राग...

वैयक्तिक दुःखे विसरून ते राष्ट्रीय नेते अमित शाह यांच्यासमवेत आदिवासी दुर्गम भागात सभा गाजवीत होते. राजकारणात जेव्हा वाईट वेळ येते, तेव्हा कसे वागले पाहिजे, काय बोलले पाहिजे, याचा परिपाठ बावनकुळेंनी घालून दिला. तीन वर्षाचा राजकीयदृष्ट्या दीर्घकाळ क्षणोक्षणी कसोटी पाहणारा ठरला. त्यातून ते तावूनसुलाखून बाहेर पडले. या काळात त्यांनी लोकांचा 'कनेक्ट' मात्र अबाधित ठेवला. याच धैर्य व सहनशीलतेचे फळ म्हणून महाराष्ट्रातील भाजपाच्या प्रमुखपदी ते विराजमान झाले. नियतीचा खेळ असा असतो. काही दिवसांपूर्वी स्वतःचे तिकीट कटल्याने संभ्रमित झालेले बावनकुळे इतरांना तिकीट वाटप करून त्यांचे राजकीय भविष्य घडविणारे सूत्रधार झाले. जबाबदारी मोठी व जोखमीची होती. डोळ्यांसमोर उद्दिष्ट असले की, जबाबदारीचा ताण येत नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा हा पक्षीय कॅप्टन आपल्या कार्यकत्यांसाठी अहोरात्र झटला. महाराष्ट्राचा कानाकोपरा त्यांनी पिंजून काढला. आपल्या कारकिर्दीतील १०६५ दिवसांच्या (२ वर्षे ११ महिने) या मोठ्या काळात ते केवळ २७दिवस आपल्या घरी वास्तव्याला होते. यावरून त्यांची कार्यशैली व कामाचा झपाटा लक्षात येईल. मानसिक खच्चीकरणाची एकही संधी विरोधक सोडणार नव्हते याची पुरेपूर जाणीव बावनकुळेंना होती. त्यात सुरुवातीच्या छोट्या-मोठ्या निवडणुकीत आलेल्या अपयशाने कारकीर्द झाकोळली जात होती. प्रदेशाध्यक्ष असल्याने चहूबाजूंनी आरोपांचा भडिमार सहन करावा लागत होता. त्यात कुचकामी अध्यक्ष म्हणून भलावण झाली. विदेश दौऱ्यांतील 'कॅसिनो'

.. प्रकरणापासून वैयक्तिक बदनामीला जावे लागत होते. बोलण्याचा रांगडी वन्हाडी बाज असल्याने समज-गैरसमजाचे विषय अंगावर घ्यावे लागले. जमीन व्यवहारातील भ्रष्टाचार ते मुलाच्या अपघात प्रकरणात अकारण गोवण्याचा प्रयत्न झाला. अशा साऱ्या आरोपांना सामोरे जाताना होणारी दमछाक मोठी होती. त्यात लोकसभेला माघारलेली पक्षप्रतिमा जिव्हारी लागण्यासारखी होती. चंद्रशेखर बावनकुळे हे मात्र स्थितप्रज्ञ राहून सामोरे जात होते. विधानसभा निवडणूक ही अंतिम संधी मानून नव्या जोशात कामाला लागले. या निवडणुकीला सामोरे जाताना मागील चुकांची पुनरावृत्ती टाळून ईप्सित शिखर गाठायचा चंग या वैदर्भीय नेत्याने बांधला.

तो पूर्णत्वास नेऊनच हा 'कॅप्टन' थांबला. प्रदेशाध्यक्ष बनताना बघितलेले स्वप्न त्यांनी अखेर वास्तवात आणले. या स्वप्नाची पूर्तता समाधान देणारी होती. 'लोक जोडणारा नेता' अशी नवी ओळख वा उपाधी बावनकुळेंना मिळाली. विदर्भाच्या या सुपुत्राची पक्षीय कप्तानपद कारकीर्द संपुष्टात येत असल्याचे शल्य निश्चितच आहे. असे असले तरी नजीकच्या भविष्यात मोठी जबाबदारी स्वीकारण्याची प्रेरणा व ताकद त्यांना मिळाली असेल हे मात्र निश्चित..! 'लीड बाय एक्झाम्पल'चे सर्वात मोठे उदाहरण म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांना इतिहास, वर्तमान आणि भविष्य स्मरणात ठेवेल, यात शंका नाही. तत्त्व, निष्ठा व निःस्वार्थी भूमिका ही आजच्या राजकारणात दुर्मीळ होत असताना बावनकुळेंनी दाखविलेला सबुरीचा मार्ग कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

000

Tags:

About The Author

Related Posts

न धरावा राग...

न धरावा राग...

कर्जावरच श्वास...

कर्जावरच श्वास...

Advertisement

Latest News

Advt